पुणे

पुणे : आता विद्यार्थी शाळेत जाणार सुरक्षित

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या एक किलोमीटरच्या परिसरातून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या शाळेत पोहचता यावे यासाठी महापालिकेकडून शाळा वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शाळांच्या ठिकाणांचे 20 झोन करण्यात आले असून, प्रत्येक विभागात महापालिकेच्या या आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत. अशा पध्दतीचा आराखडा करणारी पुणे महापालिका पहिली ठरणार आहे.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. शहरात अनेक नामांकित शाळा आणि महाविद्यालये आहेत. मात्र, आता शहरातील वाढलेल्या वाहतुकीमुळे अनेकदा शालेय परिसरात अपघाताच्या घटना घडतात. हे रोखण्यासाठी पुणे महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्या अंतर्गत एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील शाळांचे 20 विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात या नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या मार्गदर्शक सूचनांच्या पुस्तिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते गुरुवारी (दि.3) प्रकाशन केले जाणार आहे.

शाळांच्या ठिकाणांनुसार 20 झोन

शहरातील शाळांच्या ठिकाणांनुसार महापालिकेने 20 झोन तयार केले आहेत. या झोनमध्ये येरवडा, बालेवाडी, पंचमी चौक, खराडी, डेक्कन, विश्रांतवाडी, हडपसर गाव, नारायण पेठ, वडगाव शेरी, कोथरूड, वानवडी, आंबेगाव, जहांगीर हॉस्पिटल, सदशिव पेठ, बाणेर, औंध, चतु:श्रुंगी रस्ता, वारजे, कर्वे रस्ता या विभागांचा समावेश आहे.

काय आहे या आराखड्यात

शाळेत जाण्यासाठी प्रामुख्याने विद्यार्थी स्कूल बसने, पालकांच्या मदतीने किंवा स्वत: बसने जातात. मात्र, वाहतूककोंडी, अतिक्रमणे आणि अरुंद रस्ते यामुळे शाळेपर्यंत पोहचताना विद्यार्थांना मोठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन शाळेपर्यंत येणार्‍या एक किलोमीटरच्या परिसरातील रस्त्यांवर मार्गदर्शक सूचनांचा वापर करून रस्त्यांची रचना, विद्यार्थ्यांची सोय, त्यांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, शाळांच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारचे माहिती फलक, लहान मुलांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासह सुरक्षित पदपथ, रस्त्यावर मुलांसाठी विशेष गतिरोधक तसेच मुलांसाठी वेगवेगळ्या रंगसंगतीत रस्त्यांची रचना, रस्त्याच्या कडेला मुलांच्या अनुषंगाने साहित्याची उभारणी, रस्त्यावर मुलांना थांबण्यासाठी जागा अशा वेगवेगळ्या सुविधा करण्यात येणार आहेत. या आराखड्यांतर्गत महापालिकेच्या पथ विभागामार्फत या सुविधा करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT