पुणे: राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आता तीनऐवजी चार प्रवेश फेर्या राबविण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या नव्या नियमालवलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रवेशासाठी महाविद्यालय पसंतीमध्येही यंदा बदल केला जाणार असून पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या फेरीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे प्रवेशासाठी दिलेले प्राधान्यक्रम अनुक्रमे एक, तीन आणि सहा महाविद्यालय असे असणार आहे. (Latest Pune News)
याबरोबरच व्यवस्थापन कोट्यातून भरणार्या जागांचे अर्ज सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार असून, या कोट्यातील होणारे प्रवेशही संस्थांना मेरिटनुसारच भरावे लागणार आहेत.
दहावीनंतरचा पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशात बदल केल्यानंतर आता अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत तीन फेर्या राबविल्या जात असे. मात्र, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या अभ्यासक्रमांच्या चार फेर्या राबविण्यात येणार आहेत. तसेच दुसर्या, तिसर्या व चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने भरलेला पर्यायी अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा मिळणार आहे.
मागील फेर्यांमध्ये पर्यायी अर्ज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना या चौथ्या फेरीमध्ये पर्यायी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कॅप फेर्यांची संख्या वाढवून आता चौथी कॅप फेरी समाविष्ट करण्यात आली आहे.
यापूर्वी तीन फेर्यांनंतर प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येत होती. आता चौथ्या फेरीअंती प्रवेश अंतिम करण्यात येणार असून, दुसर्या फेरीनंतर अभ्यासक्रमांचा प्रवेश अंतिम ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या मर्यादित
फेर्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना खासगी किंवा व्यवस्थापन कोट्यातील महागड्या प्रवेशांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. चौथ्या फेरीमुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालय निवडणे महत्त्वाचे...
पहिल्या फेरीत: जर विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, तर त्याला तो तत्काळ निश्चित करावा लागेल.
दुसर्या फेरीत: जर त्याला पहिल्या तीन पसंतीपैकी एक महाविद्यालय मिळाले, तर प्रवेश घेणे अनिवार्य असेल; अन्यथा पुढील फेर्यांसाठी अपात्र ठरविले जाईल.
तिसर्या फेरीत: जर विद्यार्थ्याला पहिल्या सहा पसंतीपैकी कोणतेही महाविद्यालय मिळाले, तर त्याला प्रवेश घ्यावाच लागेल.
व्यवस्थापन कोटा होणार आता पारदर्शक
व्यवस्थापन कोट्यातील उपलब्ध जागांची संपूर्ण माहिती महाविद्यालयांना संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थी सीईटी कक्षाच्या पोर्टलवरूनही या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. ही सुविधा यंदा केली जाणार आहे. तसेच थेट संस्थेकडे जाऊनही हे अर्ज करता येतील.