सुवर्णा चव्हाण
पुणे : अमितने लोकगीताचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला अन् त्यावर बघता बघता लाईक्सचा वर्षाव झाला,अनेकांनी या लोकगीताला आपली पसंतीही दर्शवली. सध्या काळाप्रमाणे बदलत लोककलावंतांची नवी पिढी टेक्नोसॅव्ही बनली आहे. लोककला जगभरातील लोकांना पाहता यावी आणि महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककलेचा बाज लोकांपर्यंत पोचविण्यासाठी लोककलावंतही सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत असून, कोणी यू-ट्यूबद्वारे तर कोणी फेसबुकद्वारे अस्सल लोककला लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे.
लोककलावंत लोककला सादर करण्याशिवाय आपल्या कलेतून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीही करत आहेत. कोरोनामुळे गेले दोन वर्ष लोककलावंतांना हाल सोसावे लागले, पण यावर मार्ग काढत काहींनी आपल्या कलेला नवसंजीवनी देऊन ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. आता लोककलावंत त्याचा चांगला वापर करत आहेत. सध्या कीर्तनकारांपासून शाहीरांपर्यंत लोकनृत्यापासून ते वाघ्या मुरळीपर्यंत अशा लोककलांचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळत आहे. काही लोककलावंतांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अधिकृत पेज सुरू केले आहेत, तर काहींनी यू-ट्यूब चॅनेलही सुरू केले आहेत. सादरीकरणाचा अस्सल बाज आणि पद्धत जपत कलावंत कला सादर करत आहेत.
Jemimah Rodrigues आता क्रिकेट सोडून खेळणार हॉकी, वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने घेतला निर्णय
युवा कलावंत होनराज मावळे म्हणाला, 'सर्वच लोककलावंत सोशल मीडियाचा वापर करत आहेत असे नाही, पण काही लोककलावंतांनी ही नवी वाट शोधली आहे. खास करून लोककलावंतांची नवी पिढीही सोशल मीडियाचा चांगला उपयोग करत आहे. मीही आता या माध्यमाचा वापर करत आहे. यू-ट्यूब चॅनेलवर मी पोवाड्याचे काही व्हिडिओ पोस्ट करतो. तसेच, यू-ट्यूब चॅनेलवर आणि फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रम, दिनविशेषांचे कार्यक्रम, लोककलेवर चर्चा आणि दिग्गज कलाकारांच्या मुलाखती यातून सादर करत आहोत.
आम्ही कलेचा मूळ साचा लोकांसमोर मांडण्याचा सोशल मीडियाद्वारे प्रयत्न करत आहे. मी यासाठी सोशल मीडिया वापरण्याच्या संदर्भात प्रशिक्षणही घेतले आहे. लोककला टिकली पाहिजे आणि लोकांसमोर आली पाहिजे, हा त्यामागचा प्रयत्न आहे.' लोककलावंत बलराज काटे म्हणाले, 'जागरण गोंधळ याशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामागचा उद्देश असा की, या लोककलेचा वारसा लोकांपर्यंत पोहोचावा. आज सोशल मीडियावर कला सादरीकरणाचे प्रमाणही वाढले आहे, परंतु प्रत्येक जण लोककलेतील तो अस्सलपणा आणि त्यातील बारकावे, त्याचे महत्त्व सादर करतोच असे नाही, पण मी कला सादरीकरणातून जनजागृती करण्यासह त्यातील अस्सलपणा लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.'
इतकी वर्षे प्रत्यक्षपणे लोककलेचे सादरीकरण केले, पण काळाप्रमाणे बदलत आम्हीही सोशल मीडियाचा वापर करत आहोतच. मी सोशल मीडियावर कला सादरीकरणाचे काही व्हिडिओ पोस्ट करतो. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पद्धतीने आपली लोककला लोकांपर्यंत पोचावी, हा त्यामागचा उद्देश आहे. सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, याची आधी माहिती नव्हती. माहिती मिळवत गेलो, सोशल मीडियाचा वापर करायला शिकलो आणि ते जमून आले.
– रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत