पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्या कारवाईला पोलिस खात्याकडून खो दिला जात आहे. बोगस डॉक्टरांविरोधात तक्रार घेण्यास पोलिस ठाण्यांकडून महिनोन्महिने टाळाटाळ केली जाते, तसेच तक्रार दिल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात वैद्यकीय क्षेत्रातील बोगस पदव्या घेऊन अनेक जण वैद्यकीय व्यवसाय करतात. योग्य शिक्षण नसतानाही रुग्णांना औषधे देत उपचार केले जातात. अनेक वेळा चुकीच्या उपचारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांची संख्या दाट लोकवस्तीमध्ये व झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 2013 मध्ये बोगस डॉक्टर शोध समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त असून, आरोग्यप्रमुख सचिव असतात. तर पोलिस, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिकारी सदस्य आहेत.
नवीन दवाखान्याची माहिती आरोग्य कर्मचार्यांमार्फत मिळाल्यानंतर किंवा नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय झोनल अधिकारी संबंधित डॉक्टरची कागदपत्रे ताब्यात घेतात. त्यानंतर ती कागदपत्रे पालिकेच्या विधी विभागाकडून तपासली जातात. विधी विभागाने संबंधित डॉक्टरची कागदपत्रे किंवा पदव्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य नाहीत, असा अभिप्राय दिल्यानंतर त्या बोगस डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाते.
मात्र, पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. तसेच तक्रार घेतल्यानंतर संबंधित बोगस डॉक्टरचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करीत नाहीत, अशा तक्रारी आरोग्य विभागाकडून वरिष्ठांकडे करण्यात येत आहेत. वैद्यकीय झोनल अधिकारी बोगस डॉक्टरविरोधात तक्रार देण्यास तसेच तक्रार घेण्यास टाळाटाळ करून त्यांना दिवस दिवस बसवून ठेवले जाते. कोणत्या कलमाखाली तक्रार घ्यावी, याची माहिती नाही, यासंदर्भात शासनाच्या आदेशाची प्रत नाही, अशी कारणे पोलिसांकडून दिली जातात, अशाही तक्रारी आहेत. परिणामी, बोगस डॉक्टर दुसर्या ठिकाणी बस्तान बसवून आपला व्यवसाय पुन्हा थाटतात.
एरंडवणा येथील एका बोगस डॉक्टरची तक्रार पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली होती. वैद्यकीय अधिकार्याने संबंधित डॉक्टरची कागदपत्रे तडताळणीसाठी विधी विभागाकडे दिली होती. त्यानंतर विधी विभागाने संबंधित डॉक्टर बोगस असल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी 18 फेब—ुवारी रोजी अलंकार पोलिस ठाण्यास पत्र दिले. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आरोग्य अधिकार्यांनी 7 मार्च रोजी पुन्हा संबंधित बोगस डॉक्टरच्या तक्रारीसाठी पोलिस ठाण्याकडे विचारणा केली. त्यानंतर अलंकार पोलिसांनी वरिष्ठांकडे विचारणा करून तक्रार दाखल करू, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.