पुणे

महसूल लाखोंचा, तरीही सुविधांचा अभाव; पिंपरीमधील दस्त नोंदणी कार्यालयातील चित्र

अमृता चौगुले

शशांक तांबे

पिंपरी : वेळ दुपारी 12 ची पिंपरी येथील दस्त नोंदणी कार्यालयात नागरिकांची गर्दी…. आपला नंबर कधी येणार म्हणून सगळे वाट बघत बसलेले… त्यामध्ये आपल्या आई-वडिलांसोबत आलेले एक लहानगा सतत आईला विचारतो… आई कधी जायचं घरी… कधी जायचं घरी… आई कशीबशी मुलाची समजूत काढते… पण मुलगा शांत होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आई-वडीलही अस्वस्थ होतात आणि आपला दस्त कधी नोंदविला जाईल याची वाट पहात बसतात.

लाखोंचा महसूल मिळवून देणार्‍या दस्त नोंदणी कार्यालयात नागरिकांना सुविधा मिळत नसून, दस्त नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दस्त नोंदणी कार्यालयात पाऊल ठेवल्यापासून दस्त नोंदणी पूर्ण होईपर्यंत नागरिकांना केवळ मनस्तापच होत आहे. शहरात 6 ठिकाणी दस्त नोंदणी केली जाते. भोसरी, पिंपरी, चिंचवड, दापोडी आणि आकुर्डी याठिकाणी दस्त नोंदणी केली जाते. या सर्व ठिकाणी सातत्याने गर्दी असते. नागरिकांना बसायला पुरेशी जागा नसते तर स्वच्छतागृहांतदेखील अस्वच्छता आढळून येते. त्यामुळे लाखोंचा महसूल मिळवून देणार्‍या कार्यालयामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

सर्व्हर, इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट सेवा ह्याच सुविधा अनेकदा अडचणीच्या ठरतात. त्यात प्रामुख्याने सर्व्हर, इंटरनेट सेवा अनेकदा अडचणीच्या ठरतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. लहान मुले सोबत असल्यास त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांना बसायलाही पुरेशी जागा उपलब्ध नाही. एकाच ठिकाणी दोन कार्यालये आहेत. या ठिकाणी खूप गर्दी असते. पिंपरी येथे दोन कार्यालयें एकाच ठिकाणी असून त्या ठिकाणी नागरिकांना उभे राहाण्यासदेखील जागा नसते.

आठ टक्के मुद्रांक शुल्क

सध्या दस्त नोंदणी करताना मेट्रोचे शुल्क देखील आकारले जात आहे. साधारणपणे दिवसाकाठी एका कार्यालयात 8 ते 10 दस्त नोंदले जातात; तसेच एका घराची किंमत अंदाजे तीस ते चाळीस लाख इतकी आहे. एका कार्यालयाला दिवसाच्या दस्त नोंदणीतून लाखोंचा महसूल मिळतो. तरी देखील याठिकाणी कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत.

दिवसाला किमान आठ दस्त नोंदवले जातात. मालमत्तेची नोंदणी करताना महिलेचे नाव असल्यास शुल्कामध्ये 1 टक्का सूट दिली जाते. सुविधांच्या मानाने इथे येणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे.
-एक कर्मचारी, पिंपरी कार्यालय

सकाळी 11 वाजता आम्ही इथे आलो आहोत. आम्ही येथे येण्यापूर्वी गर्दी आहे. आमचा नंबर नक्की कधी आहे, हेच आम्हाला माहिती नाही; तसेच या कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
-श्रीकांत जायभाये, नागरिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT