पुणे

पुण्यातील सणस मैदानावर उद्घाटनानंतरही ’नो एन्ट्री’; महिन्यापूर्वीच शुभारंभ

अमृता चौगुले

पुणे : अ‍ॅथलेटिक्सपटूंना सरावाचे महत्त्वाचे ठिकाण असलेले कै. बाबूराव सणस क्रीडांगण अद्यापही बंदच असून, खेळाडूंना 'नो एन्ट्री' असल्याचे आढळून आले आहे. पुणे महापालिकेचे बाबूराव सणस क्रीडांगण गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवले होते. नवीन सिंथेटिक ट्रॅक बसवून झाल्यानंतर खेळाडूंना हे मैदान उपलब्ध होईल, अशी आशा होती. परंतु, मान्यवरांच्या तारखा उद्घाटनासाठी मिळत नसल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले.

तब्बल तीनवेळा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. अखेर मे मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते मैदानाचे आणि नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटनही करण्यात आले. परंतु, अद्याप एक महिना उलटूनही हे मैदान खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध होऊ शकलेले नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा नवीन सिंथेटिक ट्रॅक वापराविना पडून असून, खेळाडू मात्र दुसर्‍या बाजूलाच सराव करीत आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या या अडचणीची दखल प्रशासन घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनांना केराची टोपली

बाबूराव सणस क्रीडांगणाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणतेही क्रीडांगण विकसित केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाची वाट न पाहता तत्काळ खेळाडूंना उपलब्ध करून द्या, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु, या सूचनांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली असून, उद्घाटनाच्या एक महिन्यानंतरही मैदान खेळाडूंना उपलब्ध होऊ शकलेले नाही.

पालकमंत्र्यांनी खेळाडूंना मैदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना केलेल्या आहेत. मात्र, मनपाच्या क्रीडा विभागातील अधिकारी याकडे कानाडोळा करीत असून, केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. आगामी काळात पीडीए, राज्यस्तरीय आणि स्कूल ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार असून, खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित खेळाडूंना मैदानावर सराव करण्याची परवानगी द्यावी.

– संदीप निकम, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक

कै. बाबूराव सणस क्रीडा मैदानाचे उद्घाटन झाले असले, तरी वापराबाबतची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. या मान्यतेचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. ही मान्यता मिळताच खेळाडूंना मैदान खुले करण्यात येईल.

– नयना केरुरे, क्रीडा उपायुक्त, पुणे मनपा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT