पुणे: वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली प्रसार आणि समाज माध्यमांवर रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या आणि आश्वासने देणाऱ्या जाहिरातींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) चाप लावला आहे. हमखास उपचाराच्या नावाने दावा करणाऱ्या रुग्णालये, क्लिनिक आणि नोंदणीकृत डॉक्टरांच्या जाहिराती व सार्वजनिक संवादासाठी नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या डॉक्टरांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे.
आयोगाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण रोखणे, रुग्णांची फसवणूक टाळणे आणि उपचारांविषयी पारदर्शकता राखणे, हा या नियमांचा उद्देश आहे. मार्गदर्शक तत्त्वे तातडीने लागू करण्यात आली आहेत.
नव्या नियमांनुसार, स्वतःला सर्वोत्तम किंवा क्रमांक एक डॉक्टर ठरवणे, उपचारांद्वारे हमखास बरे करण्याची हमी देणे, तसेच रुग्णांच्या प्रशस्तिपत्रांचा किंवा उपचारांपूर्वीच्या आणि नंतरच्या छायाचित्रांचा जाहिरातींसाठी वापर करणे, यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि उपचारपद्धतींच्या प्रचारातून व्यावसायिक हितसंबंध जोपासण्यासही मनाई करण्यात आली आहे.
यूट्यूब, सोशल मीडियावरील जाहिरातीही रडारवर
अशा प्रकारच्या जाहिराती प्रामुख्याने यूट्यूब, सोशल मीडिया आणि अन्य डिजिटल व्यासपीठांवर सर्वाधिक पसरवल्या जात आहेत. त्यामुळे या जाहिरातींवरही लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांनाही हे नियम लागू होणार आहेत. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने बनावट रुग्णानुभव सादर करणे किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे निषिद्ध असेल. डॉक्टरांनी शैक्षणिक पात्रता, नोंदणी क्रमांक आणि व्यावसायिक माहिती स्पष्टपणे नमूद करणे अपेक्षित आहे. मात्र, आजारांविषयी जनजागृती, आरोग्यविषयक माहिती आणि शैक्षणिक मार्गदर्शनाला परवानगी देण्यात आली आहे.
पूर्वपरवानगी आवश्यक
रुग्णांची गोपनीयता राखणे आणि त्यांच्या संमतीशिवाय वैद्यकीय माहितीचा जाहिरातींसाठी वापर न करणेही आवश्यक आहे. नियमभंगाच्या गांभीर्यानुसार इशारा, समुपदेशन, नोंदणीचे निलंबन किंवा गंभीर प्रकरणांत नोंदणी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय सेवेचा प्रचार करताना डॉक्टरांना आता व्यावसायिक आकर्षणापेक्षा नैतिकतेला प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे पत्रकातील निर्देशावरून स्पष्ट झाले आहे.