पुणे: नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. खुनाच्या गुन्ह्याबाबतचे कोणतेही पोलिस रेकॉर्ड नाही. भरत गोगावले यांना याबाबत माहिती नसल्याने त्यांनी हे विधान केले असेल. ते चहापानाच्या निमित्ताने लवकर भेटतील.
जेव्हा ते माझ्या शेजारी उभे असतील तेव्हा थोडा चहा त्यांना मी माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडी भर टाकतो, असा टोला राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गोगावले यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी कुडाळ येथील बैठकीदरम्यान राणे यांनी अनेक भानगडी केल्या, खून केले. त्यामुळे ते या उंचीवर पोहोचले आहेत, असे खळबळजनक विधान केले होते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी हे उत्तर दिले. राणे म्हणाले की, नारायण राणे यांनी शिवसेना वाढवली. (Latest Pune News)
ते शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाबरोबर राहिले म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. गोगावले हे त्यांचे जुने सहकारी आहेत. मात्र, कदाचित त्यांना संपूर्ण माहिती नसेल. ते मला भेटल्यानंतर मी त्यांच्या ज्ञानात भर टाकेन. संविधानानुसार कोणतीही मर्डर केस नारायण राणे यांच्यावर नाही.