Nira River Pudhari
पुणे

Nira River Basin Water Storage: निरा नदीखोऱ्यात पावसाची दमदार बरसात; चार धरणांत ४८ टीएमसी, ९९ टक्के पाणीसाठा

भाटघर, निरा-देवघर, वीर, गुंजवणी धरणे तुडुंब; पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

परिंचे: पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेल्या निरा नदीखोऱ्यात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निरा नदी प्रणालीतील प्रमुख धरणे भरली आहेत.

जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि. ७) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भाटघर, निरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांमध्ये मिळून ४८ टीएमसी म्हणजेच ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. निरा देवघर धरणात सध्या ९८.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर गुंजवणी धरणात 91 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

या चारही धरणांवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व उद्योगांचा तसेच पिण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. सुरुवातीला मोसमी पावसाने काहीशी ओढ दिल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता; परंतु जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने कृपादृष्टी केल्याने येणारे अनेक महिने शेतकऱ्यांसाठी आनंददायी आणि समाधानकारक राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा या जिल्ह्यांतील; खंडाळा, फलटण तसेच सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक भागांना या धरणांमधून पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणीसाठ्यातील वाढीमुळे आगामी खरीप हंगामासाठी आशादायी वातावरण निर्माण झाले आहे, असे निरा उजवा कालवा विभागीय सेवकांच्या पतसंस्थेचे संचालक संभाजी शेडगे यांनी सांगितले.

हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या आठवड्यात निरा प्रणालीतील पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. धरणाची पाणीपातळी योग्य ठेवण्यासाठी कमी-जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग ठेवावा लागणार आहे.
अथर्व चक्के, शाखा अभियंता
गेल्या दीड महिन्यातील पावसामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून, खरीप पिकांसाठी पाण्याची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात विविध तरकारी, कडधान्य व फळबागा चांगल्या प्रकारे घेता येणार आहेत.
मंजूषा संतोषबापू धुमाळ, सरपंच, वीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT