बारामती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पाची फक्त घोषणा केली आहे. योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नसल्याने ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी निरा-कऱ्हा सिंचन प्रकल्पाबाबत केलेल्या घोषणेचा उल्लेख करीत सुळे यांनी ट्विट केले असून, ही निव्वळ घोषणा ठरू नये, ठोस निधीची तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात यावी, म्हणजे बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील अवर्षणग््रास्त नागरिकांत संभम राहणार नाही, अशी मागणी केली.
निरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी योजना हे स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. त्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, असे सुळे यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी आपण या योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असून, त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. दुर्दैवाने आज आपल्यात अजित पवार नाहीत. त्यांच्या जागी अर्थमंत्री या नात्याने फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी विविध प्रकल्पांची घोषणा केली. अगदी निरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचासुद्धा त्यांनी उल्लेख केला. मात्र, त्यासाठीच्या निधीच्या तरतुदीचा उल्लेख मात्र केला नाही, असे सुळे यांनी नमूद केले.