निमोणे: गावखेड्यातल्या माणसाचा वीक पॉइंट राजकारण आहे. गावातला गडी दोनच ठिकाणी मनापासून रमतो, एक तमाशाच्या फडात आणि राजकारणाच्या राड्यात. निवडणूक कोणतीही असो, समोरचा तिकडे म्हणून आम्ही इकडे, त्यांची जिरवायची, या वेडाने पिछाडलेल्या ग्रामीण माणसाची प्रस्थापित राजकारणामध्ये कशी धूळधाण होते, याचा इरसाल किस्सा शिरूर तालुक्याच्या एका मोठ्या गावात घडला.
गावगाड्यापासून चार हात लांब गेलेला आणि मावळतीकडे झुकलेला एक इरसाल गडी पार्टीची बूज राखायची म्हणून गावाकडच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाला. निवडणूक कोणतीही असो, हा गडी उरीला उभा राहून आपल्या गटाची धुरा वाहत होता, गावपातळीपासून खासदारकीपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत गावात आपण त्यांच्यापेक्षा कणभर वरचढ ठरले पाहिजे, यासाठी तहानभूक हरपून धावत होता. (Latest Pune News)
पाच ते सहा महिन्यांपूर्वी एक मोठी तालुका पातळीवरची निवडणूक आली. समोरच्या गटाचा उमेदवार हा अंगाला तेल लावलेला पैलवान होता. रणसंग्रामात जो काही दाणागोटा लागतो, त्याची रसद मतदानाच्या चार दिवस अगोदरच त्यांनी पोहोच केली होती.
गड्याच्या गोठात दाणागोटा कमी पडायचा प्रश्नच नव्हता; मात्र दुसर्या बाजूला रणांगण गाजवणारा गडी. दाणागोटा निर्णायक क्षणी कमी पडायला लागला. दोन्ही बाजूंकडून आमच्यावर लक्ष ठेवा, अशी साद घालणं हा कार्यक्रम जोरात सुरू होता. मात्र, एका बाजूकडून निवडणुकीसाठी जो दाणागोटा असतो तो घरोघरी पोहचला. परंतु, दुसर्या बाजूकडून हात जोडणे सोडून काहीच मिळाले नाही. मतदान दुसर्या दिवशी सकाळी सुरू होणार होते.
महिना-दीड महिना राबराब राबलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मस्त चांगलं वातावरण आहे, पण भंडार-खोबरं नसल्याने निवडणूक हातची जायची वेळ आली. हताश होऊन कार्यकर्ते एका जागेवर बसले, आपण त्यांना टाकलेच होते, पण काय करायचं रसदच मिळाना, गावगाड्यात हसू व्हायची वेळ आली.
काहीतरी करून रसद गोळा करू, पण परत मिळेल ना, असा खडा त्यानं टाकून पाहिला... गर्भगळीत झालेल्या कार्यकर्त्यांना तरतरी आली... मानगुटावर बसून पैसे घेऊ, पण एवढी वेळ टाळा... गड्याने फोन फिरवले, भरभक्कम दाना गोटा गोळा केला. खालची आळी, वरची आळी, वस्त्या, गावठाण घटका दोन घटकांत सगळीकडे रसद पोहोच झाली.. निवडणुकीला जे लागतं ते सगळंच मिळाले न गावाकडे पार्टी सरस ठरली... मोठ्या फरकाने उमेदवार निवडून आला, गाव गुलालात न्हालं.
फटाकडे काय, पेढे काय, सगळ्या गावात नुसती जत्रा अनुभवली. विजयी उमेदवारही गावात आला... जोरदार भाषणं झाली. विरोधकांच्या कानठळ्या बसतील असा डीजेचा आवाज झाला. विजयाच्या धुंदीत कार्यकर्ते बेफाम झाले, हळूहळू काळ वाटला. चाहुरीला राहून दाणागोटा गोळा केलेल्या कार्यकर्त्याला देणेकर्यांचा तगादा वाढला.
याचं घे त्याला दे अन् त्याचं हे याला दे करत पाच-सहा महिने गडी बेजार झाला. ज्याच्यासाठी एवढ्या उलाढाली केल्या, त्याच्या कानावर हा विषय आहे का नाही देव जाणे! मधलं कोणी पैशाचं नाव काढेना... उतारवयातला कारभार गड्याच्या भलताच अंगलट आला, हे मात्र नक्की.