पुणे : आईच्या निधनानंतर तिच्या वडिलोपार्जित जमिनीत मामाकडे हिस्सा मागितला. मात्र, मामा टाळाटाळ करीत असल्याने अखेर भाचीने दिवाणी न्यायालयाची पायरी चढत न्यायाधीश यू. पी. देवर्षी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. चार वर्षे उलटल्यावर मामाने तडजोड करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित जमिनीवर दोघांची तडजोड झाल्याने न्यायालयात तसा अहवाल सादर करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य केला अन् भाचीला आईच्या वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
विजया मोहिते (नाव बदलले आहे) हिच्या आईची मुळशी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या वडिलोपार्जित जमीन मिळकतीमध्ये विजयाचा कायदेशीर अविभक्त हिस्सा होता. विजयाने वडिलोपार्जित जमीन मिळकतीमध्ये मामांकडे कायदेशीर हिस्सा मागितला. परंतु, मामांनी हिश्याचे वडिलोपार्जित जमीन मिळकतीचे वाटप करून देण्याचे नाकारले. त्यानंतर विजयाने ॲड. विजय ललवाणी यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात मामाविरोधात दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने कायदेशीरपणे नोटीस पाठवून मामाचा जबाब मागितला. परंतु, मामाने बहीण तसेच भाची असल्याचे नाकारले व हिस्सा देण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.
विजयाने आपली आई वनिताच्या मृत्यूनंतर आपल्या मामाकडे मिळकतीत हिस्सा मागितला होता. परंतु, त्यांनी त्यास नकार दिला होता. वनिताला दोन भाऊ होते. परंतु, वनिताचे वडिलांच्या अगोदरच निधन झाले होते. त्यानंतर विजयाने मामांकडे रीतसरपणे हिस्सा मागितला. परंतु, मामांनी विजयाला 1/5 हिस्सा देण्याचे स्पष्टपणे नाकारले व वाटप करण्याचेही नाकारले होते. दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाल्याच्या चार वर्षांनंतर मामा आणि भाची यांच्यात चर्चा होऊन विजयासोबत तडजोड करण्याचे मान्य केले. याबाबतचे तडजोडपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने ते मान्य करीत त्यावर शिक्कामोर्तब केले.
मामा आणि भाची यांचे एकमत झाल्याने आम्ही तडजोडीत हा दावा निकाली काढला. त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता राहणार नाही. हक्क कोणाचाही असो, तो कायद्याने मिळायलाच हवा. विजयाचा हक्क सिद्ध करणे, हे आमचे कर्तव्य होते.ॲड. विजय हसमुख ललवाणी, भाचीचे वकील