पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील जनावरांच्या पुनर्वसनासाठी मुंढव्यात निश्चित केलेल्या जागेचे सर्वेक्षण करून गोठ्यांच्या जागेची नव्याने आखणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जागेवर असलेले गोठेधारक, सध्याचा वापर याचे सर्वेक्षण करण्यासाठी आठ दिवसांत संस्थेची नियुक्ती करणार असल्याचे महापालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले. मुंढवा येथील गायरानाच्या जागेत शहरातील जनावरांच्या गोठ्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये 70 हून गोठे येथे हलविण्यात आले.
प्रत्येक गोठेधारकांना तीन गुंठे जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी काहींनी गोठ्यांच्या जागेचा वापर अन्य व्यवसायांसाठी सुरू केला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे जागेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. तसेच अस्तित्वात असलेल्या जमिनीवर प्लॉटिंगही चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने मागील वर्षभरापासून नव्याने जागा वाटपाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, प्रशासनाने गोठेधारकांच्या पुनर्वसनासाठीच्या या जागेचे फेरसर्वेक्षण करून प्रत्येक प्लॉटची आखणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोठ्यांव्यतिरिक्त अन्य व्यवसाय करणार्यांकडून जागा काढून घेणे अन्य व्यवसायांना प्रतिबंध करणे, गोठ्यांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते व तत्सम अन्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच जागांचे अचूक वाटप करण्यासाठी या आखणीचा उपयोग होणार आहे.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात नुकतीच बैठक झाली. आरोग्य विभागाने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आठ दिवसांत सर्वेक्षणासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. या संस्थेकडूनही शक्य तितक्या लवकर अहवाल तयार करून घेत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागाने या सर्वेक्षणासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाला निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणार असल्याचे डॉ. फुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा