महेंद्र कांबळे
पुणे : पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी चौघे बुरखाधारी भेटले असल्याची खळबळजनक कबुली त्या दोघांनी तपास यंत्रणांना दिली आहे. तपास यंत्रणा आता त्या माहितीची पडताळणी करीत असून, आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पुण्यातील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटासारखी मालिका घडविण्याचा कट दोघांनी रचला होता का? या दिशेनी तपासाची चक्रे फिरली असून, त्या दोघांच्या चौकशीत दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
या प्रकरणात मोहम्मद युनूस साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) हे दोघे जण कोथरूड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला होता. इम्रान खान, युनूस साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढर्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी चार दिवस गुन्ह्याचा तपास केल्यानंतर शनिवारी गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला. तोपर्यंत गुन्ह्याचा तपास पुणे पोलिस, एनआयए, पुणे एटीएस, मुंबई एटीएस, तसेच मध्य प्रदेशच्या एटीएसच्या पथकाकडून केला जात होता. तसेच राजस्थान एनआयएची देखील टीम यावर काम करीत होती.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांकडून तपास यंत्रणांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नव्हते. परंतु, मध्य प्रदेशच्या एटीएसच्या पथकाने इम्रानकडे विचारपूस केल्यानंतर इम्रान देखील गुन्ह्यातील महत्त्वाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थान येथील बेकायदेशीर हालचाली प्रकरणातदेखील इम्रानचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने तपासाची दिशादेखील भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचेही सूत्रांनी सांगितले. परंतु, आतापर्यंतच्या तपासात इम्रानची भूमिका मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य प्रदेशाच्या पथकाला इम्रानबद्दलची असलेली माहिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने दिलेला प्रतिसाद यावरून तर पुण्यात किंवा अन्य ठिकाणी त्यांना मोठे काही तरी घडवायचे असल्याचा दाट संशय सूत्रांनी वर्तविला आहे. त्याबरोबरच त्यांना हे चौघे बुरखाधारी कोठे भेटायचेही, याचादेखील खुलासा त्याच्या चौकशीत होईल.
हेही वाचा