पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘एनटीए’ने जून 2025 च्या यूजीसी नेट सत्राच्या परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा केली आहे. अधिसूचनेनुसार ही परीक्षा आता 25 ते 29 जूनदरम्यान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांना विषयवार वेळापत्रक https:// ugcnet.nta.ac.in या अधिकृत पोर्टलवर पाहता येणार आहे.
ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, ज्यामध्ये 85 विषयांचा समावेश असणार आहे. एनटीए परीक्षेच्या तारखेच्या किमान 10 दिवस आधी परीक्षा शहराची माहिती जाहीर करेल. (Latest Pune News)
या आगाऊ सूचनेमुळे उमेदवारांना त्यांच्या प्रवासाचे आणि अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. युजीसी नेट परीक्षेचे प्रवेशपत्रदेखील परीक्षेच्या अंदाजे 10 दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
असे करा हॉलतिकीट डाउनलोड
उमेदवारांनी प्रथम ‘एनटीए’च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर यूजीसी नेट जून 2025 प्रवेशपत्र डाउनलोड शीर्षकाची लिंक पहा. नंतर तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन एंटर करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट करा. उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्रावर छापलेली तारीख, शिफ्टची वेळ आणि ठिकाण यासह सर्व माहिती पुन्हा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.