पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी होते. मात्र, त्या गर्दीचे रुपांतर मतात होत नाही. तर, उद्धव ठाकरे यांना सभांचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पवार हे शनिवारी पुणे दौर्यावर होते. या वेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेदरम्यान पवार यांनी ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. (Latest Pune News)
राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आले तर, मुंबई महापालिकेत काय परिस्थिती राहील या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, आतापर्यंतच्या अनुभवाचा विचार करता लक्षात येते की, राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र त्याचे मतात परिवर्तन होत नाही.
महाविकास आघाडीसंदर्भात विचारले असता, पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे. दुसरीकडे महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईलच असे वाटत नाही. राहुल गांधी यांच्या लेखाबद्दल म्हणाले, लेख अजून वाचला नाही. पण बाजूला काढून ठेवला आहे. संध्याकाळी वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचा निर्णय स्थानिक पातळीवर : खा. सुळे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या जातात. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीत असतानाही आम्ही स्वतंत्रपणे लढलो. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी इच्छा असते.
त्यामुळे कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही सर्व एकत्र येऊन चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी पुण्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, संघटना कोणा एकामुळे चालत नाही. नेत्याबरोबर कार्यकर्ता हा महत्त्वाचा आणि मुख्य केंद्र बिंदू असतो. तो रस्त्यावर लढत असतो. त्यामुळे कार्यकर्त्याला काय वाटते हे महत्त्वाचे असते. जर राज ठाकरे महाविकास आघाडीत येत असतील, तर त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे.