नसरापूर: नसरापूर (ता. भोर) श्री स्वामी समर्थनगर येथील दोन भाडोत्री सामान्य कुटुंबातील मोठा खर्च येणार असल्याने भाजलेल्या मुलांच्या उपचारासाठी दै. 'पुढारी 'मधून आवाहन करण्यात आले होते, मदतीच्या आवाहनाला शालेय विद्यार्थ्यांच्या खाऊच्या रकमेपासून सामाजिक संघटना, राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी व अनेक दानशूरांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू असल्याने मुलांवर सध्या यशस्वी उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यात अचानक पेटलेल्या फटाक्यामुळे दोन मुले गंभीर भाजली होती. दै. 'पुढारी'मधून शनिवार (दि. ८) 'नसरापूरच्या जळीत मुलांना हवाय मदतीचा हात' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच त्याच दिवसापासून सूर्यवंशी हॉस्पिटलच्या दिलेल्या यूपीआय स्कॅनरवर नागरिकांनी आर्थिक मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. यामुळे संस्कार प्रदीप झेंडे (वय ११), साई तुषार गाडेकर (वय १२), या भाजलेल्या मुलांची प्रकृती सुधारत आहे.
जळीत घटनेची माहिती समजताच आमदार शंकर मांडेकर यांनी मंगळवारी (दि. ११) मुलांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. या वेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विक्रम खुटवड, माजी उपसरपंच संदीप कदम, नामदेव चव्हाण, सारिका बागमार, डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. दरम्यान, परिसरातील अनेक राजकीय, उद्योजकांसह सर्वसामान्य घटकातील नागरिक मदत करीत असल्याने हतबल कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
मदत करण्याचे ऋणानुबंध कायम लक्षात राहतील...
नसरापुरातील नागरिकांनी वेळीच धीर दिल्याने व दै. 'पुढारी'च्या वृत्तामुळे आमच्या मुलांच्या उपचारासाठी आर्थिक मदत होत आहे. तसेच समाजातील अनेकांनी आर्थिक मदत हात पुढे केले आहे. या सर्वांचे ऋणानुबंध आमच्या कायम लक्षात राहील, अशी भावना व्यक्त करीत असताना दोन्ही कुटुंबातील पालकांचे डोळे डबडबले होते.