चाकण: महिलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीमध्ये झाले. यामध्ये पुतण्याने चुलत्याच्या छातीत लोखंडी गज घुसवून त्यांचा खून केला, तर चुलत भावाला लोखंडी गजाने गंभीर मारहाण केल्याची घटना बहुळ (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
दत्तात्रय पानसरे (वय 62, रा. चांदणी चौक, पानसरेवस्ती, बहुळ, ता. खेड) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव असून, तुकाराम दत्तात्रय पानसरे (वय 38) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Pune News)
तुकाराम पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा चुलत भाऊ दशरथ गुलाब पानसरे (रा. चांदणी चौक, पानसरेवस्ती, बहुळ, ता. खेड) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बहुळ गावातील चांदणी चौक, पानसरेवस्ती येथे फिर्यादी तुकाराम यांची पत्नी व आरोपी दशरथ याची पत्नी यांच्यात काही किरकोळ कारणावरून भांडण झाले.
सणसवाडी येथे कंपनीत कामावर गेलेला आरोपी दशरथ याला त्याच्या पत्नीने फोन करून भांडणाची माहिती देत घरी बोलावून घेतले. दुचाकीवरून घरी आलेल्या दशरथ पानसरेने कसलाही विचार न करता हातात लोखंडी गज घेतला.
त्यानंतर चुलत भाऊ तुकाराम यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात लोखंडी गज घुसवण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादी तुकाराम यांनी स्वतःचा डावा हात पुढे केला असता डाव्या हातामध्ये गज आरपार घुसून ते जखमी झाले.
या वेळी तत्काळ फिर्यादी तुकाराम यांचे वडील दत्तात्रय पानसरे हे आरोपी दशरथ यास पकडण्यासाठी गेले असता दशरथने आपले चुलते दत्तात्रय पानसरे यांच्या छातीत मधोमध लोखंडी गज घुसवला. जखमी अवस्थेत फिर्यादी तुकाराम आणि त्यांच्या वडिलांना चाकण येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, छातीत मधोमध गज घुसवलेला असल्याने दत्तात्रय पानसरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दशरथ व त्याची पत्नी यांना ताब्यात घेतले आहे.