पुणे

मद्य परवान्याला नगण्य प्रतिसाद; केवळ दीड लाख नागरिकांनी घेतला मद्यसेवनाचा परवाना

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दारू खरेदी करणे आणि पिणे यासाठी लागणारा एक वर्षासाठी आणि एक दिवसासाठीचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेणार्‍या दारुप्रेमींची संख्या नगण्य असल्याचे दै. 'पुढारी'ने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ रोज पुणे परिसरातल्या रेस्टॉरंट, बार, पबमध्ये दारू पिणार्‍या हजारो नागरिकांकडून परवान्याचा नियम धुडकावला जात असल्याचे दिसते.

रेस्टॉरंट बार, पबमध्ये मद्यसेवन असो, की मद्याच्या दुकानातून मद्य खरेदी, त्यासाठी कायद्याने आवश्यक असलेला कायमस्वरूपी परवाना एप्रिल 2023 ते मार्च 2024 या बारा महिन्यांच्या काळात दीड लाख लोकांनी घेतला आहे. तसेच, एक वर्षासाठीचा आणि एक दिवसाचा परवाना घेण्याचे प्रमाणही नगन्य आहे. त्यामुळे मद्यविक्री आणि मद्यसेवन मोठ्या संख्येने बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचे पुढे आले आहे. वयाची 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला मद्यसेवनाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जातो. कल्याणीनगर येथे भरधाव वेगातील आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

भरधाव वेगातील कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. त्याने मद्यसेवन केल्याचे समोर आले. त्यावरून अल्पवयीन मुलांना मद्यविक्री का केली, असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच, त्या मुलाला मद्य देणार्‍या पबचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, या प्रकारावरून मद्यविक्री किंवा मद्यसेवनात नियमांचे पालन होत नसल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले आहे.
मद्यविक्री आणि मद्यसेवन यांवर राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. कायद्यानुसार मद्यसेवन किंवा मद्याच्या वाहतुकीसाठी नियमांची चौकट आहे. विशेषत: त्यासाठी परवाना बंधनकारक आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवस, एक वर्षाचा किंवा कायमस्वरूपीचा परवाना दिला जातो. मात्र, हे परवाने घेण्याकडे मद्यपी करणारे नागरिक काणाडोळा करतात. उत्पादन शुल्क विभागाकडून एक वर्षात एक लाख 56 हजार 96 जणांनी परवाने घेतले आहेत.

परवान्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क

  • एक दिवसाचा परवाना
  • देशी 2 रुपये
  • विदेशी 5 रुपये
  • एक वर्षाचा परवाना 100 रुपये
  • कायमस्वरूपीचा परवाना 1000 रुपये

हेही वाचा

SCROLL FOR NEXT