NEET UG Pudhari
पुणे

NEET Paper Leak Case Update: नीट पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुख्याध्यापिकेच्या मोबाईलमधून समोर आलेल्या माहितीमुळे तेजस शहा व डॉ. उषा यांच्या भूमिकेवर सीबीआय तपास केंद्रित

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्याशी संबंधित मोबाईलमध्ये गॉड नावाने आढळून आलेला क्रमांक हा तेजस शहा नामक विद्यार्थ्यांचा असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याचा शोध सीबीआय पथकाकाकडून घेतला जात आहे.

दरम्यान, या मोबाईलमध्ये डॉ. उषा या नावाने सेव्ह असलेला क्रमांकही तपासाच्या केंद्रस्थानी आली असून, हा नंबर कोणाचा, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची पडताळणीही सुरु असल्याचे समजते. मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांनी या गॉडकडून किती पैसे घेतले, त्याचा या प्रकरणात काय रोल होता, याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे. दरम्यान, गॉड या नावाने सेव्ह असलेला मोबाईल क्रमांक ट्रू-कॉलरवर तेजस या नावाने नोंद असल्याचे दिसून येते, असे माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

तेजस व डॉ. उषा यांच्याकडून हवालदार यांनी स्वीकारलेले सुमारे 45 हजार रुपये त्यांनी कुठे ठेवले वा खर्च केले, याची माहिती त्या देऊ शकल्या नाहीत. त्यांच्या घरझडतीदरम्यान मिळालेल्या मोबाईलवरून डिलिट केलेले काही संशयास्पद चॅटिंग पुन्हा मिळविण्यात तपास पथकाला यश आले आल्याची माहित सुत्रांनी दिली.

मनीषा हवालदार यांनी एनटीएच्या गोपनीय कामादरम्यान भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात नोट्स तयार करून त्या स्वतःकडे ठेवल्या होत्या. त्यानंतर पैशांसाठी व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट्सच्या माध्यमातून परीक्षेपूर्वीच हे प्रश्न काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. मनीषा मांढरे यांच्याशी संगनमत करून हा गैरप्रकार केला, असा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, हवालदार यांच्या ट्रान्झिट रिमांडची मूदत संपली असून, त्यांना सोमवारी दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

तेजसला शेअर केले प्रश्न!

हवालदार यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न लक्षात ठेऊन रसायनशास्त्र विषयातील एका तज्ज्ञांच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये गॉड म्हणून नोंद केलेल्या तेजस शहा या विद्यार्थ्याला शेअर केले होते. त्यानंतर मनीषा मांढरेच्या सूचनेवरून शाळेच्या संगणकावरून त्यांनी काही प्रश्नांच्या प्रिंट्सही घेतल्याची माहिती त्यांनी पथकाला दिल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT