पुणे

पुणे : फलटण तालुक्यातील प्रकल्पांमुळेच निरा प्रदूषित!

अमृता चौगुले

अनिल तावरे

सांगवी : निरा नदीच्या चांगल्या पाण्यात फलटण तालुक्याच्या प्रकल्पांतीलच रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत आहे, हे सोमंथळी बंधार्‍यात पश्चिम बाजूला साठविण्यात आलेल्या चांगल्या पाण्यावरून सिद्ध होते आहे. सोमंथळी बंधार्‍याच्या पूर्व बाजूला शिरवली बंधार्‍याचे पाणलोट क्षेत्र आहे. या नदीपात्रात घाणीच्या ओढ्यातून येणारे प्रदूषित रसायनमिश्रित काळेकुट्ट सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले आहे.

घाणीच्या ओढ्यातून येणारे प्रदूषित काळे पाणी मिसळतेय निरेच्या पाण्यात

प्रत्येक वेळी शिरवली बंधार्‍यात पाणी अडविण्यात आले की, फलटण तालुक्यातील खासगी व सहकारी प्रकल्पांतील रसायनमिश्रित काळेकुट्ट सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. त्यामुळे शिरवली बंधार्‍यातील पाणी प्रदूषित होत असते. यंदाही घाणीच्या ओढ्यातून येणारे रसायनमिश्रित काळेकुट्ट सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहते आहे.

या प्रदूषित पाण्यामुळे सोमंथळी बंधार्‍याच्या खालच्या बाजूला पूर्वेला काळ्याकुट्ट पाण्याची दुर्गंधी पसरली असून, मृत माशांचा खच साचला आहे. घाणीच्या ओढ्यातून येणारे प्रदूषित पाणी मिसळून शिरवली बंधार्‍यातील पाणी प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. हेच शिरवली बंधार्‍यातील प्रदूषित काळे पाणी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात गळती होऊन निरा-वागज बंधार्‍यातील पाण्यात मिसळून त्याही बंधार्‍यातील पाणी प्रदूषित काळेकुट्ट झाले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT