पुणे : पुढारी वृत्तसेवा : पतसंस्थांची थकबाकी वसुली ही अडचण असून, जप्त केलेल्या मालमत्ता विकत घेण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे अशा मालमत्तांच्या विक्रीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकारी तत्त्वावर अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करण्यावर सांघिकपणे अभ्यासपूर्ण विचार व्हायला हवा. अशी कंपनी कायद्यानुसार स्थापन करता येत असून, याकामी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतल्यास सहकार आयुक्तालयाचा सकारात्मक प्रतिसाद घेऊन हा प्रश्न निकाली काढता येईल, अशी सूचना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केली.
सहकारी पतसंस्था आणि मल्टिस्टेट सोसायट्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी दै. 'पुढारी'च्या वतीने एकदिवसीय 'पुढारी सहकार महापरिषद' शनिवारी (दि. 24) पुण्यात झाली. दीपप्रज्वलन करून या महापरिषदेचे उद्घाटन सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे पुणे विभागप्रमुख सुशील जाधव, गो कॅशलेस इंडिया प्रा. लि.चे चेअरमन कृष्णत चन्ने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे तसेच श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी आणि बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी 'पुढारी'च्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अनास्कर म्हणाले की, मालमत्ता जप्तीबाबत सिक्युरिटायझेशन कायद्याचा बराच बोलबाला झाला. परंतु, राज्याच्या सहकार कायद्यात अशी तरतूद 1960 पासूनच अस्तित्वात आहे. त्यासाठी सर्व पतसंस्था चळवळीने व फेडरेशनने पुढाकार घ्यावा. सहकार आयुक्तालय त्यासाठी सकारात्मक असून, दोघांनीही हातात हात घालून काम केल्यास सहकारी तत्त्वावर अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापून जप्त मालमत्ताच्या विक्रीचा प्रश्न निकाली काढता येईल.
राज्यातील सहकार चळवळीला काही विशिष्ट लोकांच्या चुकामुळे संपूर्ण सहकाराची प्रतिमा चांगली असूनही तिला गालबोट लागते. त्यामुळे सहकार क्षेत्राला स्वतःची प्रतिमा संवर्धन करणेही काळाची गरज असल्याचे नमूद करून ते म्हणाले, गावगाड्यातील आपला ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून पतसंस्था करीत असलेले काम महत्त्वाचे आहे. कारण अर्थव्यवस्थेत सामान्यांचा पैसा पतसंस्था चळवळीमधून येत आहे. सावकारी पाशातून शेतकर्यांना मुक्त करण्यासाठीही पतसंस्थांचे खेडोपाडी योगदान आहे. पतसंस्थांमध्ये संचालक मंडळाप्रमाणेच सेवकवर्गसुध्दा काळाप्रमाणे सखोल ज्ञान माहिती असलेला जाणकार असायला हवा. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग हा सक्षम असायला हवा.
अडचणीतील शाखांचे विलिनीकरण करा, कर्ज देताना चांगला कर्जदार ग्राहक मिळविण्याचे आव्हान चळवळीसमोर आहे. त्यामुळे पतसंस्थांनी कर्ज दिल्यानंतर काही ठिकाणी अडचणी आलेल्या आपण पाहतो. त्यामुळे अडचणीत आलेल्या पतसंस्थांमधील काही शाखांचे विलिनीकरण अन्य पतसंस्थेत करण्याची संकल्पना आणायला हवी. तसे झाल्यास उर्वरित शाखा सक्षम राहून पतसंस्था अडचणीत येणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युथ को-ऑप. सोसायटी संकल्पना राबवा. केरळचे सहकार विभागाचे शिष्टमंडळाने नुकतीच राज्य सहकारी बँकेस भेट दिली. त्यांच्याकडे युथ को-ऑप सोसायटी अशी संकल्पना आहे. आपल्याकडे पतसंस्था चळवळीत आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर वाढीव व्याजदर दिला जातो, त्या धर्तीवर 30 वर्षांच्या आतील तरुणांना कर्जपुरवठा करून नियमित परतफेड केल्यास व्याजात एक टक्का सवलत देण्याची योजना आणण्याचा विचार करायला हवा. तसेच एकूण 18 पैकी 6 संचालक हे युवा गटातील ठेवण्याचा बदल उपविधीमध्ये बदल करून तो अमलात आणला पाहिजे.
पतसंस्थांचे रूपांतर बँकांमध्ये नको. पतसंस्थांचे रूपांतर बँकांमध्ये करण्याची चूक पतसंस्थांनी करू नये, असा सल्ला देत अनास्कर म्हणाले की, तुम्ही स्वायत्ता घालवू नका. रिझर्व्ह बँकेचे जास्तीत जास्त नफा व ठेवीदारांचे हित असे धोरण आहे. तर सहकारात जरुरी पुरता नफा व सभासदांचे हित असे सूत्र आहे. बँकिंगपासून पतसंस्थांनी अलिप्त राहा. त्यामुळे पतसंस्था व्यवसायाभिमुख होण्यासाठी त्यांनी त्यांच्या उपविधीमध्ये (बायलॉज) बदल करायला हवा. आपली गरज ओळखून त्यामध्ये बदल करण्याची आता आवश्यकता आहे. पतसंस्था चळवळीच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रश्नांचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात यावा. तो सहकार आयुक्तांकडे देऊन आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी 'पुढारी'चे व्यासपीठ महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही अनास्कर यांनी व्यक्त केला.
बँकिंग बाय कोलॅब्रेशन, बँकिग पार्टनरशिप, वसुलीच्या वेळी पोलिस कर्मचार्यांना पतसंस्था फेडरशेनच्या परसेवेकर घेणे, कर्जदाराचा विमा व परतफेडीनुसार प्रीमियम कमी करणे इत्यादी अनेक कल्पनाही अनास्कर यांनी या वेळी बोलताना सुचविल्या. सहकार चळवळीच्या प्रवाहात नवतरुण हवेत. सहकार आयुक्त सहकार क्षेत्राच्या प्रवाहात नवतरुणांना आणण्याचे आव्हान चळवळीपुढे आहे. कारण पतसंस्था चळवळ पुढे चालविण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असून, सचोटी आणि प्रामाणिकपणे काम झाल्यास ही चळवळ पुढे अधिक बळकट होईल, असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले.
ते म्हणाले, पतसंस्थांच्या ठेवींना बँकाप्रमाणेच विमा संरक्षणाची गरज आहे. केरळमध्ये विमा संरक्षण असल्याने एकही संस्था अवसायनात गेलेली नसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे विमा संरक्षणामुळे ठेवीदार पुढे येऊन पतसंस्थांबद्दल विश्वास वाढेल. शासन आणि पतसंस्थांनी हातात हात घालून काम केल्यास चळवळ वाढेल, त्यासाठी सर्वांची साथ व सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी पतसंस्थांनी स्वतःवर काही बंधने घालून काम करण्याची आवश्यकता आहे. गरिबांचे जीवनमान उंचावत पतसंस्था योगदान मोठे आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवान व अचूक सेवा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. पतसंस्थांची बलस्थाने महत्त्वाचीच आहेत.
परंतु, सायबर सिक्युरिटीचा धोकासुध्दा आहे. त्यामुळे पतसंस्था चळवळ शाश्वत राहण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सहकार चळवळीला शंभर वर्षांहून अधिक काळचा इतिहास असून, त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. त्यामुळेच देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. पुढारी सहकार महापरिषदेचे मुख्य प्रायोजक दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड असून, महापरिषदेस लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ही पॉवर्ड बाय, डिजिटल पार्टनर गो कॅशेलस इंडिया प्रा. लिमिटेड आणि सहयोगी प्रायोजक श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी, तर समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्र राज्य, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे सहप्रायोजक आहेत.
या सहकार महापरिषदेत पुणे आणि अहमदनगर येथील पतसंस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महापरिषदेचे स्वागत 'पुढारी'चे पुणे युनिटचे मार्केटिंग प्रमुख संतोष धुमाळ, निवासी संपादक सुनील माळी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन मार्केटिंग विभागाचे सहायक व्यवस्थापक रूपेश रहाणे यांनी केले.
सहकार व्यासपीठाबद्दल दै. 'पुढारी'चे अभिनंदन
सहकार पतसंस्थांसाठी दै. 'पुढारी'च्या वतीने 'पुढारी सहकार महापरिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पतसंस्था आणि सहकार विभागांस एका व्यासपीठावर आणण्याचे काम करून त्यांच्या प्रश्नांवर ऊहापोह होऊन त्यांची सोडवणूक, आगामी दिशा ठरविण्यासाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त असून, याबद्दल मी 'पुढारी' परिवाराचे अभिनंदन करतो, असेही अनास्कर यांनी या वेळी नमूद केले. तर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनीही पतसंस्थांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ उभे केल्याबद्दल आभार मानले.
हे ही वाचा :