पुणे

वाचनसंस्कृतीसाठी व्यासपीठाची गरज; संपादकांच्या चर्चेतील सूर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाचनसंस्कृतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक यंत्रणा विकसित केली पाहिजे. संभाव्य वाचकांपर्यंत पोहचण्यासाठीचे व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वृत्तपत्रांचे वाचन केल्यास पुस्तकांच्या वाचनाकडे वळता येईल. पुस्तकांचे मार्केटिंग झाले पाहिजे. पुस्तके वाचकांपर्यंत जातील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर वृत्तपत्र संपादकांच्या चर्चेत उमटला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात गुरुवारी 'वाचनसंस्कृतीतील माध्यमांचे योगदान' या विषयावर वृत्तपत्रांच्या संपादकांचे चर्चासत्र झाले. यामध्ये 'पुढारी'चे निवासी संपादक सुनील माळी, मुकुंद संगोराम, श्रीधर लोणी, सम्राट फडणीस, किरण शेलार यांनी सहभाग घेतला.

माळी म्हणाले की, सर्वसामान्य लोकांना भाषा कळली पाहिजे इतकी ती सोपी असायला हवी. वाचकांना कलासंस्कृतीबाबतच्या घडामोडी पाहिजे असतात म्हणून वृत्तपत्र वाचले जाते. अवांतर वाचण्याची गोडी लावण्यासाठी वृत्तपत्र ही पहिली पायरी असते. लेखनाचा केंद्रबिंदूही आता महानगरातून मराठवाडा, विदर्भाकडे सरकला आहे. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन, यात समन्वय साधला पाहिजे. पुस्तकाच्या दर्जाबरोबरच त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे. अपेक्षित वाचकांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था असली की लोक नक्की पुस्तक घेतात.
संगोराम म्हणाले, हल्ली कुणीच वाचत नाही, असे म्हटले जाते. पण, त्यात काहीतरी गडबड, असे वाटते. एकेकाळी साप्ताहिक पुरवण्या ललित साहित्याने भरलेल्या असायच्या, त्याची जागा आता वैचारिक लेखांनी घेतली.

लोकांनी वृत्तपत्र वाचली, तर पुस्तके वाचतील. वाचन ही प्रक्रिया आहे. चांगले साहित्य असेल तर लोक नक्की वाचतात, यावर संपादकांनी विश्वास ठेवला पाहिजे. लोणी म्हणाले, वृत्तपत्र हे वाचनसंस्कृतीचे वाहक आहे. मराठी साहित्य आणि वृत्तपत्र यांनी हातात हात घालून काम केले आहे. वाचनाची सवय असली पाहिजे. वाचन हा लेखनाचा रियाज आहे. मुलांनी वाचवण्यासाठी आईवडिलांनी वाचले पाहिजे. त्यासाठी घरात भरपूर पुस्तके ठेवली पाहिजेत. वाचनसंस्कृती टिकली, तर वृत्तपत्र टिकणार आहे. पुस्तकाची बाजारपेठ अद्याप विकसित झालेली नाही. पुस्तक घेण्याची भूक आहे. प्रकाशक नकारात्मक बोलत आहेत. प्रकाशक व्यवसाय नाही म्हणतात, पण मग ते या व्यवसायात का आहेत?

फडणीस म्हणाले, वाचन चांगले असले पाहिजे. ते प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. मोबाईल हा वाचनातील सर्वांत मोठा अडथळा आहे, असे म्हटले जाते. पण, मोबाईलवरही चांगले वाचता येते. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या वाचनासाठी केला पाहिजे. लहान मुलांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुस्तकांचे कॉमिक्समध्ये रूपांतर केले पाहिजे. लेखनाचा घाट बदलण्याची गरज आहे. मराठी, बंगाली भाषेतील पुस्तकांना चांगले दिवस आहेत. शेलार म्हणाले, आपल्या देशात पुस्तकाचा दर्जा महत्त्वाचा आहे. दर्जेदार साहित्य असेल तर वाचन चळवळीला मदत होईल. तसेच आपल्याकडे संदर्भ साहित्याला खूप मोठी मागणी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्याची निर्मिती केली पाहिजे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT