पुणे: पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता या संदर्भातील हालचालींना वेग आला आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची महत्त्वाची बैठक सुरू असून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख स्थानिक नेते एकत्र जमले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, आमदार चेतन तुपे, प्रदीप देशमुख आदी नेते उपस्थित आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याची शक्यता तसेच आगामी राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेससोबत जाण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांची एक गुप्त बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर घडामोडी व चर्चेचा आढावा अजित पवार यांना सविस्तरपणे कळविण्यासाठी सर्व नेते त्यांच्या दालनात दाखल झाल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांच्यासोबतही गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात येत्या काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
याबाबत बोलताना सुभाष जगताप म्हणाले, रात्री दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलं आहे. जागा वाटपासाठी दोन दोन पावलं आम्ही मागे घेणार २५ किंवा २६ डिसेंबर दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार.