Maharashtra Politics: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस व शिवसेना (उबाठा) आणि मित्रपक्ष, असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मविआच्या उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसांत जाहीर होईल.
त्यात बारामतीच्या उमेदवाराचेही नाव असेल. बारामतीप्रमाणे राज्यातही जनतेच्या मनातील उमेदवारालाच आम्ही संधी देऊ, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. त्यांच्या विधानामुळे बारामतीत युगेंद्र पवार यांनाच संधी मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
बारामतीत (Baramati) पत्रकारांशी बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, बारामतीत कोण उमेदवार असेल, ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. समोरून तरी अद्याप यादी कुठे प्रसिद्ध झाली आहे? अशी विचारणा त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्ली दौर्याबाबत त्यांनी चिमटा काढला.
दिल्लीला जायला न आवडणारे पूर्वीचे अजित पवार मला आठवतात. आता ते दिल्लीला कशासाठी गेले, हे मला माहीत नाही. माझा त्यांच्याशी गेले काही महिने संपर्क नाही, असे त्या म्हणाल्या. मविआचे निर्णय एकत्रितपणे राज्यपातळीवर, तर तिकडील निर्णय दिल्लीत होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. चिन्हाबाबत सुरू असलेल्या लढाईवर त्या म्हणाल्या, याप्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे मला आमच्या वकिलांनी कळविले आहे.
इंदापुरात प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार
इंदापूरमधून प्रवीण माने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याबाबत खा. सुळे म्हणाल्या की, त्यांनी लोकसभेला अर्धा माझा, तर अर्धा विरोधकांचा प्रचार केला होता. आप्पासाहेब जगदाळे इच्छुक होते. त्यांची इच्छा रास्तच होती. कारण, माझ्या संघर्षाच्या काळात इंदापुरात जगदाळे व शहा कुटुंबे माझ्या मागे उभे राहिली, हे मी आयुष्यात विसणार नाही. जे उभे राहिले नाहीत. त्यांनाही विसरणार नाही.
छोटासा भाग सोडला, तर कुटुंब एकत्रच
पवार कुटुंबातील 99 टक्के लोक एकत्रच आहेत. एक छोटासा भाग सोडला, तर कुटुंब एकसंध आहे. माझ्या निवडणुकीत, कौटुंबिक कार्यक्रमात तुम्ही हे पाहिले आहे. कुटुंबाचा एक छोटासा भाग काही कारणांमुळे वेगळा झाला. प्रत्येकाच्या काही अडचणी असू शकतात. मी माझे वागणे नियंत्रित करू शकते, समोरच्यांचे नाही, असे म्हणत त्यांनी कौटुंबिक प्रश्नावर भाष्य केले.
ती रक्कम 15 ते 50 कोटी
खेड शिवापूरला वाहनात सापडलेल्या रकमेबद्दल खा. सुळे म्हणाल्या, ती रक्कम पाच नव्हे तर 15 ते 50 कोटी रुपये असल्याचे मला समजले आहे. यासंबंधी मी यंत्रणेशी बोलले आहे. ते वाहन कोणाचे होते, एवढी रक्कम आली कुठून, याची चौकशी व्हायला हवी. नोटबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कशी नेली जाते, असा सवाल त्यांनी केला.