ठाणे : दोन वर्षांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या बंडात साथ देणाऱ्या आमदारांना व त्यांच्या परिवारांनाही साथ देत ४५ उमेदवारांची पहिली यादी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.22) रात्री जाहीर केली.
गेल्या आठवड्यात भाजपने आपली पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी देणारी आपली पहिली यादी जाहीर केली. महायुतीचा तिसरा घटकपक्ष अजित पवार गटाने आपली यादी अद्याप जाहीर केली नसली तरी तब्बल २० उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे ए बी फॉर्म आधीच दिले आहेत. कोकणातील पेच मुख्यमंत्री शिंदे कसा सोडवतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देत शिंदे यांनी हा भाऊबंदकीचा पेच सोडवला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची नाराजी दूर करण्यासाठी आधी त्यांचे चिरंजीव सिध्देश कदम यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करून मंत्रिपदाचा दर्जा दिला. आता त्यांचे दूसरे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांचे नाव या पहिल्या यादीत नाही. बुधवारी (दि.23) त्यांचा भाजप सोडून शिंदे सेनेत प्रवेश झाल्यानंतर पुढच्या यादीत त्यांची उमेदवारी घोषीत होवू शकते. ते कुडाळमधून विधानसभा लढवतील.
मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून केवळ ४८ मतांनी लोकसभेवर निवडून गेलेले रवींद्र वायकर यांचा जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघही वायकरांच्याच घरात ठेवण्यात आला आहे. वायकरांच्या पत्नी सौ. मनिषा यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव यांना भायखळा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले संदीपान भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघही मुख्यमंत्री शिंदे यांनी भुमरेंच्याच कुटुंबाला ठेवला आहे. त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना पैठणची उमेदवारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी, साक्री मंजुळा गावीत, चोपडा -चंद्रकांत सोनवणे, जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील, पाचोरा- किशोर पाटील, एरंडोल अमोल पाटील, मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील, बुलढाणा- संजय गायकवाड, मेहकर - संजय रायमुलकर, दर्यापूर - अभिजीत अडसूळ, आशिष जयस्वाल रामटेक, भंडारा- नरेंद्र भोंडेकर, दिग्रस संजय राठोड, नांदेडउत्तर बालाजी कल्याणकर, कळमनुरी संतोष बांगर, जालना- अर्जुन खोतकर, सिल्लोड अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगर मध्य प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट, पैठण विलास भूमरे, माहिम सदा सरवणकर, राजापूर - किरण सामंत, रत्नागिरी उदय सामंत