पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत रोज वेगवेगळ्या व्यक्तींनी उलटसुलट वक्तव्ये करण्यापेक्षा दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत संघटितपणे चर्चा करून निर्णय घ्यावा. मात्र, या प्रक्रियेत संबंधित सर्व गटांसह भाजप आणि एनडीए या तिसऱ्या महत्त्वाच्या घटकाचाही विचार करून पुढील पावले टाकावी लागतील, अशी भूमिका ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी मांडली. विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कितीही चर्चा झाली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. विलीनीकरणाच्या पुढील वाटचालीत सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही भुजबळ म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी भिडे वाडा स्मारकाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना वरील भाष्य केले. भुजबळ म्हणाले, की विलीनीकरणाचा निर्णय घेतांना दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या मतांचा विचार करावा लागेल. अजितदादा आता आपल्यात नाहीत; मात्र जयंत पाटील आहेत. भाजप, एनडीए आणि संबंधित सर्व घटकांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागेल . विलीनीकरणाबाबत वारंवार चर्चा करण्यापेक्षा लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा ती चर्चा होऊच नये. रोज त्याच विषयावर चर्चा सुरू आहे. जेव्हा चर्चा होईल, तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट मांडेन. पार्थ पवार यांच्या या चर्चेतील भूमिकेबाबत विचारले असता, ते पुण्यात असल्याने हा प्रश्न त्यांनाच विचारावा, असे भुजबळ म्हणाले.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आनंदच!
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वतंत्रपणे एनडीएमध्ये सामील झाली आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या, तर आपणास आनंदच होईल. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात अजित पवार व जयंत पाटील यांच्यात बैठका झाल्या होत्या. आज अजित पवार नाहीत, मात्र जयंत पाटील आहेत. विलीनीकरणाच्या केवळ चर्चा करून उपयोग नाही. दोन्ही पक्षांच्या लोकांनी सामुदायिकपणे बसून यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
पोस्टरबाजीवर संयमाची भूमिका
अजित पवार यांच्या अपघाताबाबत मफलरचा फोटो असलेले बॅनर लागल्याच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, ''कोण काय म्हणाला, यावर मी उत्तर देणार नाही. आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सगळ्या एजन्सीचे रिपोर्ट आल्यावर त्यावर भाष्य करणे योग्य राहणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असून, कोणाला आपण थांबवू शकत नाही.''
माझ्या आयुष्यात दोनच नेते
माझ्या आयुष्यात माझे दोन नेते असून, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार. ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र आले, तर मला आनंदच आहे. ठाकरे कुटुंबीयांचे एकत्रित येणे सोपे होते, कारण राज ठाकरे हे स्वतंत्र असल्याने त्यांनी निर्णय घेतला. पवार कुटुंबात मात्र एक जण एनडीएत आणि दुसरा इंडिया आघाडीत आहे, त्यामुळे हळूवार पद्धतीने विचार करावा लागणार आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.