शिरूर: विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर-हवेलीमध्ये सत्तांतर होऊन अजित पवार यांच्या पक्षाचा आमदार झाल्यानंतरही शिरूर तालुक्यामध्ये मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वविना पोरकी झाल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये कोण नेतृत्व करते? याचाच उलगडा कार्यकर्त्यांना झाला नसून, तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे असूनही संघटनेत कुठेही भक्कम स्थिती सध्या दिसत नाही.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांचा पराभव करीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे विक्रमी मतांनी निवडून आले. त्यानंतर अनेकांनी शिरूर तालुक्यात आशावाद धरला. सत्ता बदलानंतर काहीतरी वेगळे घडेल, अशी आशा होती. (Latest Pune News)
मात्र, आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका जवळ आल्या असतानासुद्धा शिरूर तालुका राष्ट्रवादीमध्ये बेबनाव असून, संघटनात्मक मजबुती कुठेच दिसत नसून, फक्त छान छान करण्यातच पदाधिकारी पुढे दिसत आहेत. स्वतःला ’मिनी आमदार’ समजणारे काही पदाधिकारी संघटनेकडे दुर्लक्ष करीत असून, त्यांनी संघटना वार्यावर सोडून दिल्याचे चित्र सध्या शिरूर तालुक्यात दिसत आहे.
सत्तेच्या माध्यमातून संघटनेचा वापर करून नागरिकांची काम करणे गरजेचे आहे. मात्र, शिरूर शहर व तालुक्यातील पदाधिकारी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास स्वतः पुढे येत नसून, फक्त स्वतःची कामे करण्यात हे पदाधिकारी दंग आहेत. पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व एमआयडीसीतही सर्व पदाधिकारी आर्थिक हितसंबंध जपत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्यांवर ’मलिदागँग’चा आरोप झाला आहे. या ’मलिदागँग’च्या आरोपाला त्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाहीये. अनेक पदाधिकार्यांना माजी आमदार अशोक पवार यांच्या काळात अनेक पदे मिळाली. मात्र, अशोक पवार यांना विरोध करताना यांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला.
मात्र, आज एक वर्षानंतरसुद्धा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. माजी आमदार अशोक पवार यांना विरोध करीत ’घोडागंगा’चा मुद्दा गाजवत या मुद्द्यावर विद्यमान आमदारांनी मते मागितली मात्र आज पर्यंत त्यांना ’घोडगंगा’बाबत कुठलाच निर्णय न झाल्याने सभासदांची फसवणूक झाल्याचे आज तालुक्यात बोलले जात आहे.
अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी पक्षाचा वापर करीत असून, पक्षाची कुठलीही ताकद तालुक्यात दिसत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी निवडणूक लढविणार? हा मोठा प्रश्न आहे.
महायुतीमध्ये असणारे दोन्ही भाजप व शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीबरोबर कुठेही कार्यक्रमात दिसत नाही. शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तर आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कुठल्याच कार्यक्रमात आजपर्यंत दिसले नाहीत. काही भाजपचे लोक काही गटांत विखुरले गेले असून, काही लोक राष्ट्रवादीवर आहेत, तर काही लोक हे अलिप्त राहण्यात पसंत करीत आहेत.
शिरूर शहरातील काही पदाधिकारी फक्त नगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. पक्षाचे त्यांना काही घेणेदेणे नाही. आम्ही कसे निवडून येऊ नगरपरिषदला, हे फक्त ते पाहत आहेत. नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नावर ते रस्त्यावर उतरलेच नाहीत. सत्ता असतानासुद्धा नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात येत नसून, फक्त आपण कसे नगरसेवक होऊ व कसे पुढे पुढे करू, एवढेच ते पाहत आहेत. आमदार आले की पुढे पुढे करायचे, आमदार गेले की पक्ष बासनात बांधून ठेवायचा, अशी अवस्था शिरूर शहरात व तालुक्यात झाली असून, शिरूर शहरात जर वेळीच लक्ष दिले नाही, तर पक्षाचे भवितव्य अवघड आहे.