पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी समाजकंटकाकडून राजकीय बदनामी केली जात असल्याच म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Latest Pune News)
परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. या गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही.
या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, असे म्हणत मानकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलीसांसमोर सादर केली. पोलीसांनी दिपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.