राजगुरुनगर: सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासूनच जिल्हा परिषदेवर व बहुतेक पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले असून, याचे परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दिसणार आहेत. बहुतेक ठिकाणी उमेदवारीसाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वाधिक रस्सीखेच होऊ शकते, असे सध्या वातावरण निर्माण होत आहे. (Latest Pune News)
पुणे जिल्हा परिषदेवर गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे म्हणजे अजित पवारांचे वर्चस्व राहिले आहे. ग्रामीण भागात आजही बहुतेक ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच बोलबाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर एक शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एक अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी विभागणी झाली आहे. एकाच पक्षाचे दोन पक्ष होऊन नेतृत्व वेगवेगळे झाले असले तरी ग्रामीण भागात इतर पक्षांच्या तुलनेत इच्छुक उमेदवारांचा ओढा याच दोन पक्षांकडे सर्वाधिक असल्याचे लक्षात येते.
शिवसेना पक्षाची विभागणी होऊन एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर दुसरी उध्दव ठाकरे यांची अशा दोन शिवसेना झाल्या असून, पक्ष फुटीचा फटका शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत बसू शकतो. निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात सध्या तरी नेतृत्व डळमळीत दिसत असून, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर शिंदे शिवसेना, उध्दव शिवसेना नंतर भाजप आणि सर्वात शेवटी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याची मानसिकता अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये दिसत आहे. याला काही प्रमाणात स्थानिक आमदार ज्या पक्षाचा असेल त्याच्याकडे देखील उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार प्रयत्न करू शकतात. परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये खरी चुरस पाहिला मिळू शकते.
तिकीट वाटप ठरणार महत्त्वाचे
खेड , जुन्नर, आंबेगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक झुंज देऊ शकते. खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका असली तर शरद पवार गटदेखील येथे सक्रिय असून, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे याचा गटदेखील सक्रिय भूमिका निभावू शकतो. परंतु, खेड तालुक्यात उध्दव शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय मुठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हीच परिस्थिती आंबेगाव माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील व शरद पवार गटाचे देवदत्त निकम झुंज देऊ शकतात. तर जुन्नर तालुक्यात माजी आमदार अमोल बेनके विरुध्द विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची भूमिका तिकीट निश्चितीमध्ये महत्त्वाची राहू शकते.