Mahayuti internal dispute on ward structure
पुणे: महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार झाला असून, ही रचना करताना भाजपने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना विश्वासात घेतले नसल्याने महायुतीत नाराजीचा सूर उमटला आहे. भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार या दोन्ही पदाधिकार्यांनी पक्षनेत्यांकडे केल्याचे सांगण्यात येत असून, त्यावर ऐन निवडणुकीत महायुतीत संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते. येत्या दि. 4 ऑगस्टला प्रारूप रचनेचा हा आराखडा महापालिकेकडून शासनाला सादर होणार आहे. (Latest Pune News)
हा आराखडा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी सत्ताधारी पक्षाला त्यात झुकते माप मिळते किंवा त्यांच्या सूचनेनुसारच रचना तयार होतात, हे उघड सत्य आहे. त्यामुळे राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे महायुतीचे सरकार सत्तेवर असल्याने या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सोयीनुसार रचना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
प्रत्यक्षात मात्र प्रभागरचना करताना भाजपने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना विश्वासातच घेतले नसल्याची ओरड आता या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांकडून सुरू आहे. प्रभागरचनेचा आराखडा करताना आम्हाला विचारण्यात आले नाही आणि आमच्या सूचनाही ऐकून घेण्यात आलेल्या नाहीत, असे काही पदाधिकार्यांकडून पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असल्याचे समजते. मात्र, पवार यांनी त्यावर काहीच कार्यवाही न केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या शहर पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार शिंदे यांनी थेट महापालिका आयुक्तांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे शिवसेनेच्या शहर पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
त्यामुळे आता प्रभागरचनेत महायुतीमधील केवळ एकाच पक्षाचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.परिणामी, महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुतीत त्यावरून संघर्ष उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.