Nazare Dam Water Crisis Pudhari
पुणे

Pune Nazare Dam Water Crisis: नाझरे धरणात पाणी शून्यावर; पुरंदर तालुक्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट

उपयुक्त पाणीसाठा संपल्याने जेजुरीसह ५६ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात, मृतसाठ्यातील पाणीच आधार

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी: पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे (मल्हार सागर) धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. आता मृतसाठ्यातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जात आहे. या परिसरात जून महिना संपत आला तरी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, पाऊस लांबल्याने यंदा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. तर या धरणातून जेजुरी शहर, जेजुरी एमआयडीसी, पारगाव-माळशिरस योजना, नाझरे-पांडेश्वर, मावडी व इतर गावे या योजनांतर्गत जवळपास ५६ गावे व वाडी-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तर एक हजार हेक्टर शेत जमीन हंगामी स्वरुपात ओलिता खाली येते. आता मात्र या धरणात शनिवारी (दि. २७) मृत साठ्याखाली पाणीसाठा गेला आहे. यात गाळाचे प्रमाण अधिक आहे.

पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४९६ मिलीमीटर आहे. गेल्या वर्षी मे व जून महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी २५ जून रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मात्र पुरंदर तालुक्यात ना मान्सूनपूर्व ना मान्सूनचा पाऊस झाला. परिणामी, दि. २६ जूनअखेर तालुक्यात केवळ ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाझरे धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याच्या खाली गेले असून, दि. ३१ ऑगस्टपर्यंत यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

गेली अनेक वर्षे जेजुरी शहराला चार दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. सध्या मांडकी डोहावरील योजनेच्या दुरुस्तीचे काम, तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन या योजनेतून जेजुरी शहराला पाणी मिळून जेजुरीचा पाणी प्रश्न तात्पुरता मिटणार आहे. मात्र, नाझरे धरणावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण होणार आहे.

वीर धरणावरून जेजुरी शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी नवीन पाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. एक वर्षात ही योजना पूर्ण होणार आहे. ही योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर जेजुरी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचे जेजुरीकरांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT