पुणे

Navratri 2023 : विधिवत घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दारी फुलांचे तोरण अन् रांगोळ्यांच्या पायघड्या… पारपंरिक वेशभूषेत सहकुटुंब एकत्र येऊन केलेली देवीची आराधना आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत प्रत्येकाने घेतलेला उस्फूर्त सहभाग… अशा उत्साही वातावरणात घरोघरी विधिवत पद्धतीने रविवारी घटस्थापना करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आदिशक्तीचे आगमन झाले आणि प्रत्येक जण आदिशक्तीच्या आगमनाने सुखावून गेला. यंदाचा नवरात्र उत्सव सगळीकडे मांगल्य आणि आनंद घेऊन आला आहे.

संबंधित बातम्या :

घराघरांत चैतन्य बहरले असून, रविवारी पहिल्या दिवशीच हा आनंद सगळीकडे पाहायला मिळाला. घराघरांत मंत्रोच्चारामुळे एक वेगळेच वातावरण रंगले होते. देव्हार्‍यात अखंड नंदादीप तेवत, झेंडूच्या फुलांची सजावट करीत, नक्षीदार रांगोळी काढत देवीचे स्वागत झाले. महिला-युवतींची नवरात्र उत्सवाची तयारी पहाटेपासूनच सुरू होती अन् मुहुर्तावर देवीची विधिवत पूजा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. प्रथेप्रमाणे देवीला नैवेद्यही दाखविण्यात आला. महिला-युवतींनी खास मराठमोळी वेशभूषा केली होती. त्यांनी दिवसभर उपवासही केला. सायंकाळी सहकुटुंब मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

मंडळांचाही उत्साह
मंडळाच्या नवरात्र उत्सवालाही जल्लोषात सुरुवात झाली. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, बँड पथकाच्या वादनात मिरवणुकाही काढण्यात आल्या. काही मंडळांनी डीजेही लावले होते. सकाळी सुरू झालेल्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरू होत्या. पदाधिकार्‍यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना करण्यात झाली. दिवसभर विविध भक्तिगीतेही सुरू होती, सायंकाळी विद्युतरोषणाईने उत्सव मंडपही उजळले होते. भाविकांनी मंडळांच्या ठिकाणीही देवीचे दर्शन घेतले. पहिल्याच दिवशी दांडिया-गरबा आणि महिलांसाठी विविध स्पर्धा रंगल्या. मध्यवर्ती पेठांसह डेक्कन परिसर, कॅम्प, नवी पेठ, स्वारगेट आदी ठिकाणच्या मंडळांमध्ये नवरात्र उत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. सोसायट्यांमध्येही नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. नवरात्र उत्सवाचा उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. देवीच्या आगमनाची छायाचित्रे, व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले. तसेच, नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

बाजारेपेठत लगबग
सकाळच्या वेळी बाजारपेठांमध्ये लगबग दिसून आली. फुले, घट, माती, पाच फळे, दिवे, रांगोळीसह पूजेच्या साहित्य खरेदीवर महिला-युवतींनी भर दिला. तसेच, मिठाईच्या दुकानातून प्रसाद आणि मिठाई खरेदी करण्यात आली. तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता आणि मंडई येथे खरेदीसाठीचा उत्साह पाहायला मिळाला.

SCROLL FOR NEXT