पुणे: शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि.११) प्रारंभ होत असल्याने उपवासाच्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. साबूदाणा, भगर, शेंगदाणा, राजगिऱ्यासह विविध जिनसांनी गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजार सज्ज झाला आहे.
यंदा दर्जेदार मालाच्या तुटवड्यामुळे भगरीच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये नवीन शेंगदाण्याचा हंगाम सुरू झाल्याने त्याचे दर शंभर किलोमागे ४० रुपयांनी उतरले आहेत. तर, साबूदाण्याचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवात साबूदाण्याची खिचडी, भगर, राजगिऱ्याच्या पुऱ्या, थालीपीठ आदी पदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ विक्रेत्यांकडूनही खरेदी सुरू झाली आहे. तामिळनाडूतील सेलम परिसरातून विविध प्रतींचा साबूदाणा; तर गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून शेंगदाणा दाखल होत आहे.
भगरीसाठी लागणारा कच्चा माल तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून येतो. त्यावर नाशिक परिसरात प्रक्रिया करून तयार भगर बाजारात पाठवली जाते. याखेरीज उत्तर भारतातून शिंगाडा, कुट्टू आणि त्यांच्या पिठांचाही पुरवठा होत असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या साहित्याला मागणी वाढू लागली आहे. साबूदाणा आणि शेंगदाण्याचे दर सध्या स्थिर असून, दर्जेदार कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे भगरीचे दर वाढले आहेत. गुजरातमधून नवीन शेंगदाण्याची आवक सुरू झाल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे. सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पुरेसा माल उपलब्ध असून, घटस्थापनेनंतर खरेदीला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे.आशिष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड