Navale Bridge Pudhari
पुणे

Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर पुन्हा वाढला धोका; अपघातस्थळी अनधिकृत पार्किंग

भीषण दुर्घटनेनंतरही उपाययोजना अपुऱ्या; महामार्गावर ट्रक-बसमुळे अपघाताचा वाढता धोका

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर गेल्या वर्षी 13 नोव्हेंबर रोजी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला होता. त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ज्या ठिकाणी एकाच कुटुंबातील आठ सदस्यांचा जळून कोळसा झाला. मात्र, या अपघाताच्या गांभीर्याचा प्रशासनाला विसर पडल्याने त्याच ‌‘ब्लॅक स्पॉट‌’सह नवले पूल परिसराला अनधिकृत पार्किंगचा विळखा पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

नवले पूल परिसरातील या भीषण अपघाताला सोमवारी (दि. 13) पाच महिने पूर्ण झाले. या प्रदीर्घ काळानंतर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, या पाहण्याच्या हेतूने दैनिक ‌‘पुढारी‌’ने या भीषण अपघातस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, येथे महामार्गावरील रस्त्यावर अपघाताचा धोका आणखी गंभीर होत चालल्याचे दिसून आले.

महामार्गाच्या कडेलाच थांबताहेत मोठमोठे ट्रक अन्‌‍ कंटनेर

नोव्हेंबर 2025 मधील त्या भीषण अपघातानंतर येथील सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने विविध उपाय योजल्याचे अनेक दावे प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, पाच महिन्यांनंतर येथे केलेल्या पाहणीत ज्या ठिकाणी अपघात झाला होता, तिथेच आता महामार्गाच्या कडेला अनधिकृत पार्किंग सुरू असल्याचे दिसून आले. येथे अनेक मोठमोठे ट्रक आणि कंटेनर भररस्त्यात उभे केले जात आहेत. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हल्स बस बिनधास्तपणे महामार्गावरच प्रवाशांची चढ-उतार करताना दिसून आले. परिणामी पुन्हा एखाद्या मोठ्या अपघाताला आमंत्रण दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कात्रज बोगद्याकडून येताना नवले पुलाचा उतार खूप तीव आहे. त्यातच जर रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे अनधिकृतपणे ट्रक आणि बस उभ्या असतील, तर अचानक बेक लावणे अशक्य होते. नवले पूल परिसरात झालेली ती भीषण अपघाताची घटना डोळ्यासमोर येते, तेव्हा येथून गाडी चालवतानाही भीती वाटते. रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
सागर शिंदे, वाहनचालक
नवले पुलावर झालेल्या त्या भीषण अपघाताने संपूर्ण पुणे हादरले होते. त्याच अपघातस्थळी महामार्गावर होणारे अनधिकृत पार्किंग हे मृत्यूला आमंत्रण देणारे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
कोमल नवले, स्थानिक नगरसेविका
त्या दिवशीच्या अपघाताचा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या आम्ही अजूनही विसरू शकलेलो नाही. पाच महिने झाले, पण काहीही बदललेले नाही. रस्ता मोकळा हवा म्हणून आम्ही ओरडतोय, पण येथे रस्त्यालगत महामार्गावरच सर्रासपणे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. प्रशासनाला कदाचित अजून एका मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असे आम्हाला वाटते.
सारंग नवले, स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT