अमृत भांडवलकर
सासवड : सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या शहरात तापू लागले आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक जणांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे, तर काही बंडखोरांचे बंड शमविण्यात भाजपच्या नेत्यांना यश मिळेल का? हे दि. 3 डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल.
दरम्यान, सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 17) अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 6 तर नगरसेवकपदासाठी 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार करमणूक कर शाखा पुणे सतीश थेटे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आनंदीकाकी चंदूकाका जगताप, शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे अधिकृत उमेदवार सचिन सुरेशराव भोंगळे, महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित मधुकर जगताप आदींसह सासवडमधील सर्वच घटकपक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहे. सासवडला बंडखोरीचे पीक आले असून, आता नेते आपापल्या पक्षातील बंडखोरीचे तण काढणार की बंडखोरीचे पीक फोफावणार, हे दि. 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. पुरंदरमध्ये ‘माजी आमदार संजय जगताप विरुद्ध आमदार विजय शिवतारे’ यांच्यात मुख्य लढत होईल, असे चित्र आहे.
या निवडणुकीत ‘भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी’ अशी तिरंगी लढत होणार, हे निश्चित झाले आहे. उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी भाजपला आणखी किती धक्के बसणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उमेदवारांची यादी जाहीर न करता एबी फॉर्म वाटून बंडोबांना गाफील ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न अखेर फसला. उमेदवारांची गोपनीय यादी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने भाजपला बंडाळीचा दणका बसला आहे.
सासवड नगरपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून नाराजीचे नाट्य उफाळले आहे. पक्षात अनेक वर्षे काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच काँग््रेासमधून आलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकू येत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप यांनी अर्ज दाखल केला होता. सासवड शहराध्यक्ष आनंदभैया जगताप आणि शहर किसान मोर्चाचे अध्यक्ष जालिंदर जगताप यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, तिघांच्याही उमेदवारीला नकार देण्यात आल्यानंतर नाराजीचा भडका उडाला आहे. तिन्ही नेते भाजपचे जुने, सक्रिय आणि निवडणूक शिस्तीत घडलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यासाठी साकेत जगताप यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत असून, त्यांच्या पत्नीला नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळते. तरीही, या निर्णयामुळे जुन्यांना डावलून नव्यांना संधी मिळत असल्याची भावना सासवड भाजपमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पक्षाच्या वाढीत मेहनत घेणाऱ्यांना सोडून नव्यांना तातडीने तिकीट मिळत असल्याने संघटनात अस्वस्थता वाढत आहे. आगामी दिवसांत ही नाराजी शमते का की सासवड भाजपमध्ये याचा परिणाम पुढील निवडणूक रणनीतीवर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साकेत जगताप यांनी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे म्हटले आहे. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करीत असतो, असे त्यांनी म्हटले आहे. तिकीट मागणे आपले काम आहे. द्यायचे की नाही, ते वरिष्ठ ठरवतील आणि त्यांच्या आदेशानुसारच काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.