धायरी : मुंबई -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात होणाऱ्या वाहन अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात परिसरातीलही काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात अपयश आलेल्या प्रशासनाविरोधात स्थानिकांकडून शनिवारी दशक्रियाविधी आंदोलन करण्यात आले. या वाढत्या अपघातांमुळे उद्भवलेल्या असंतोषाचा पुन्हा उद्रेक झाला.
परिसरात सतत होणारे भयानक अपघात व यामध्ये जाणारे अनेक निष्पाप लोकांचे बळी याकरिता ठोस उपाययोजना करण्याकरिता ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळी प्रतीकात्मक विधिवत दशक्रियाविधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्या सुरेखा दमिष्टे, काँग्रेस नेत्या अर्चना शहा, राजाभाऊ जाधव, सोमनाथ शेडगे, संजय सुर्वे, गणेश निंबाळकर, विठ्ठल सूर्यवंशी, हरीश वैद्य, आनंद थेऊरकर, लतिफ शेख, नीलेश दमिस्टे, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर, सूरज दांगडे इत्यादींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नागरिक सहभागी झाले होते.
सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील गवळी, सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, समीर कदम, महिला पोलिस उपनिरीक्षक नमता सोनवणे यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
मुंबई-बंगळुरू हायवेवर दशक्रियाविधी आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे आणि नागरिक.