Pune Navale Bridge Accident Pudhari
पुणे

Pune Navale Bridge: पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, आग लागलेल्या दोन ट्रकमध्ये अडकली कार

Navale Bridge Pune accident today: नवले पुलावर गावगाडा हॉटेलसमोर संध्याकाळी अपघात झाला

पुढारी डिजिटल टीम

Pune Navale Bridge Accident

पुणे : मुंबई बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात गुरूवारी (दि. 13) संध्याकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि कारला लागलेल्‍या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला असून मृतांमध्ये कारमधील चौघांचा समावेश आहे. कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्‍यामुळे हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.  

शहरातील ब्लॅकस्पॉट पैकी एक असलेल्‍या नवले पुलावर गावगाडा हॉटेलसमोर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर संध्याकाळी अपघात झाला. दोन कंटेनरच्‍या मध्ये अडकलेल्‍या स्विफ्ट कारने पेट घेतल्‍यानंतर त्‍यात चार जण होरपळून व इतर वाहनांमधील चार जणांचा होरपळून मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

संध्याकाळी सहा वाजण्याच्‍या सुमारास नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने भूमकर चौक ते नवले पुल परिसरातील वाहनांना उडविले. या अपघातात दोन कंटेनरच्‍या मधोमध एक स्विफ्ट कार चेपली गेल्‍याने कारने पेट घेतला. यामध्ये कारमधील चौघांचा होरपळून मृत्‍यू झाला. सायंकाळी सात वाजण्याच्‍या सुमारास त्‍यांचे मृतदेह बाहेर काढले जात होते. मात्र कार जळून खाक झाल्‍याने गाडीत नेमके कोण होते ही ओळख पटविणे कठीण जात होते. कारमधून चालक, पती-पत्नी आणि त्यांचे बाळ असे चौघे जण प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

15 ते 20 गाड्यांची धडक झाल्‍याने अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली. अपघातात कार, रिक्षा, दुचाकी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचेही नुकसान झाले.  अग्निशमन दल घटनास्‍थळी पोहचल्‍यानंतर काही  मिनीटांतच आगीवर नियंत्रण मिळवले परंतु, अपघात अडकलेली कार जळून खाक झाली होती. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दल, पीएमआरडीचे अग्निशमन दल, पुणे वाहतुक विभाग, सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, आरोग्य रूग्णवाहिका यांचे मदतकार्य सुरू होते. 

एक किलोमीटरपर्यंत वाहनांना उडवत नेले

भरधाव कंटेनरने भूमकर चौक ते नवले ब्रीज अशा सुमारे एक किलोमीटरपर्यंत 10 ते 15 वाहनांना धडक दिली.  यात 15 ते 20 जण जखमी झाले. जळालेल्या कारची अवस्था बघून कारमधील प्रवाशांची काय अवस्था झाली असेल या विचारानेच प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT