National Teacher Award Pudhari
पुणे

National Teacher Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी स्व-नामांकन प्रक्रिया सुरू; १० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय, स्थानिक स्वराज्य व अनुदानित शाळांतील शिक्षकांना ऑनलाइन अर्जाची संधी; शिक्षण संचालनालयाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या सन २०२६ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकने मागवण्यात आली आहेत. इच्छुक शिक्षकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १५ जूनपासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्जदार शिक्षकांना स्व-नामांकन सादर करता येणार आहे.

शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना अर्ज करता येईल.

केंद्र सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा देशातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान मानला जातो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराद्वारे गौरवतात.

पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन स्व-नामांकन सुरू-१५ जून २०२६

  • स्व-नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत-१० जुलै २०२६

  • अर्ज अंतिम स्वरूपात सादर करण्याची अंतिम मुदत-१३ जुलै २०२६

  • संकेतस्थळ: nationalawardstoteachers.education.gov.in

यांना आहे अर्ज करण्याची संधी

  • शासकीय शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक

  • मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT