पुणे : एचसीएल फाऊंडेशनच्या सहकाऱ्याने आयोजित राष्ट्रीय क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत अंतिम फेरीत संजोय दरवडा (49 धावा) गणेश भुसारा (44 धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीसह माजी भरत (24 धावा व 1-30) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गुजरात संघाने कर्नाटक संघाचा 20 धावांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले.
गुजरात संघाने 20 षटकांत 6 बाद 198 धावाचे आव्हान उभे केले. यात संजोय दरवडाने 27 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 49 धावा, गणेश भुसाराने 33 चेंडूत 44 धावा, माजी भरतने 24 धावा, अनिल गरियाने 20 धावा, हितेश पटेलने नाबाद 14 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
कर्नाटक संघ 20 षटकांत 5 बाद 178 धावाच करू शकला. यात प्रभु हलियालने 52 चेंडूंत 10 चौकारासह 75 धावा, तर रंगा एन ने 42 चेंडूंत 7 चौकारांसह 64 धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. गुजरात संघाकडून रामभाई पारे (2-23), मनीष हडीया (1-44) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 20 धावांनी विजय मिळवून दिला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजीत बडे, पीबीएमएचे अध्यक्ष राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया यांसह मान्यवर उपस्थित होते.