Nasrapur Case Protest Pudhari
पुणे

Nasrapur Case Protest: नसरापूर प्रकरणाचे राज्यभर उमटले तीव्र पडसाद

या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पुणे शहरात त्याचे पडसाद उमटले होते.

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको, कँडल मार्च, कडकडीत बंद पाळून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पुणे शहरात त्याचे पडसाद उमटले होते.

२ मे रोजी नागरिकांनी नवले पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरही आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले होते.

३ मे रोजी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खेडशिवापूर टोल नाक्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदवला होता.

१० मे रोजी या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात कँडल मार्च मोर्चा काढला होता. या वेळी काळ्या फिती लावून नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. भोर, नसरापूरसह अन्य शहरांतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला.

नसरापूरला तीव्र आंदोलन

नसरापूरला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने सातारा रस्त्यावर सुरुवातीलाच आंदोलनाची मोठी तीव्रता पाहायला मिळाली. शेकडो नागरिकांनी आणि तरुणांनी एकत्र येत सातारा रस्त्यावर नसरापूरजवळ ठिय्या मांडला आणि ''रस्ता रोको'' केला. यामुळे कात्रज घाट आणि सातारा रस्त्याकडून शहरात येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनाक्रम

१ मे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून

१ मे : संशयित भीमराव कांबळेला ताब्यात घेतले

३ मे : प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक

४ मे : घटनेच्या निषेधार्थ नसरापूर, भोर आणि परिसरात बंद व आंदोलने

७ मे : घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना

१० मे : निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा

१४ मे : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

१६ मे : अवघ्या १६ दिवसांत दोषारोपपत्र दाखल

२८ मे : आरोपीविरुद्ध आरोपनिश्चित केले

२९ मे : जलदगती खटल्यास इन-कॅमेरा सुरुवात

३० मे : मुलीच्या पालकांसह पहिल्या महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी सुरू

२ जून : प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलांची साक्ष

३ जून : आरोपीने गुन्ह्याची न्यायबाह्य कबुली दिल्याची माहिती न्यायालयात सादर

६ जून : न्यायवैद्यक तज्ज्ञांची साक्ष पूर्ण

१३ जून : ५३ साक्षीदारांची साक्ष पूर्ण; सीसीटीव्ही पुराव्याची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून पुष्टी

१७ जून : सरकारी पक्षाने पुरावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली; ५५ साक्षीदारांची साक्ष नोंद

२० जून : दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण

२५ जून : न्यायालयाने कांबळेला दोषी ठरवले

२९ जून : न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT