नसरापूर: नसरापूर (ता. भोर) परिसरात अनेक बुलेटचालक मूळ सायलेन्सर बदलून ठो-फट्ट असे आवाज करत दिवसभर फिरत असतात. त्यातच हायवाचेही सतत कर्णकर्कश हॉर्न वाजत असतात. यामुळे बाजारपेठ परिसरातील नागरिक पुरते हैराण झाल्याचे चित्र आहे.
हायवा किंवा बुलेट गाड्यांच्या कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने नसरापूर बाजारपेठेत नागरिक त्रस्त होत आहेत, विशेष सायलेन्सर बदलून ठो-फट्ट अशा कानठळ्या बसवणाऱ्या मूळ आवाजाने सामाजिक शांतता भंग होत आहे. नसरापूर शहर व परिसरात गोंधळ आणि त्रासाचे वातावरण निर्माण होत आहे. यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
नसरापूर परिसरात शाळा महाविद्यालय, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय आहेत. येथे विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशातच येथे हायवाचे मोठे हॉर्न आणि बुलेटच्या मोठ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे मुलांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे मात्र या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बुलेटचे सायलेन्सर बदलून काहीजण बाजारपेठ, रहिवाशी सोसायटी, महाविद्यालय परिसरात दिवसभर ‘ठो-फट्ट’ असे आवाज काढत फिरत असतात. या आवाजाने सामाजिक शांतता भंग झाली आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांच्या बुलेट जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अनिल गयावळ, नामदेव चव्हाण, धनंजय शेटे यांनी केली आहे.
कर्णकर्कश आवाजाने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. उत्पादन करणाऱ्या संस्थांवर बंदी घालण्यात यावी. तरच ध्वनिप्रदूषणाची समस्या दूर होऊ शकतेडॉ. राजेंद्र डिंबळे, सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर
हायवाचे आवाज आणि बुलेट सायलेन्सर आणि मॉडिफाईड हॉर्नने शांतता भंग होते. त्यामुळे अशी वाहने जप्त करून सायलेन्सर नष्ट करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे सूचना दिल्या आहेत.राजेश गवळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, राजगड