राजगुरुनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा तब्बल 16 पदरी एलिव्हेटेड रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली होती. निविदा 25 सप्टेंबरला उघडण्यात येणार होती.
परंतु, या रस्त्यासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणारी केवळ 14 हेक्टर जागा संबंधित एजन्सीला ताब्यात न दिल्याने हा रस्ता आणखी लांबणीवर पडणार आहे. निविदा प्रक्रिया आणखी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. (Latest Pune News)
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-नाशिक महामार्ग मोशी ते राजगुरुनगर यादरम्यान अतिप्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीला देखील या वाहतूक कोंडीचा फार मोठा फटका बसत आहे. यासंदर्भात वारंवार आंदोलन करून, शासनाला निवेदन देऊन देखील गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.
दिवसेंदिवस तो अधिकच गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नाशिक फाटा ते राजगुरुनगर तब्बल 16 पदरी एलिव्हेटेड रस्ता प्रस्तावित केला आहे. सुमारे 30 किलोमीटर रस्त्यावर आठपदरी जमिनीवर व पुलावर आठपदरी असा एलिव्हेटेड रस्ता असणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून तब्बल 7 हजार 827 कोटी रुपयांची निविदा देखील जाहीर केली आहे.
जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. या निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना संबंधित एजन्सीने राज्य शासनाकडून शंभर टक्के जागा ताब्यात आल्यानंतरच टेंडर ओपन करण्यात येईल, अशी अट घातली आहे. या प्रकल्पासाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी आणि चाकण यादरम्यान 14 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
gv ही संपूर्ण पीएमआरडीएची हद्द असून, जागा संपादित करून राष्ट्रीय महामार्गाला देणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या एक-दीड वर्षापासून केवळ 14 हेक्टर जागेसाठी हा प्रकल्प रखडला आहे. यामुळेच 25 सप्टेंबर रोजी उघडणारी निविदा आता 23 ऑक्टोबर रोजी उघडली जाणार आहे.
राज्य शासनाकडून 14 हेक्टर जागा अद्यापही ताब्यात देण्यात आली नाही, यामुळेच ही निविदा उघडण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, जागा ताब्यात येण्याची अट शिथिल करण्यात आली असून, महिनाभरात राज्य शासनाकडून जागा ताब्यात आली नाही, तरी 23 ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या कामाला गती येईल.- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग