पुणे

Nasarapur Case SIT : नसरापूरप्रकरणी एसआयटी स्थापन, नराधमाला फाशी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस

विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची शिफारस, राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही प्रकरणाची गंभीर दखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/पुणे : नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्याात संतापाची लाट उसळली असून, तीव्र जनभावनेची दखल घेऊन शासनाने या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना रविवारी केली. दरम्यान, यातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विशेष चौकशी पथकात दोन महिला अधिकाऱ्यांसह पुणे ग्रामीण पोलिसांमधील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या एसआयटीमार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नसरापूर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून याला ‌‘बालकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन‌’ म्हटले आहे. आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपीविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

या प्रकरणातील पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री तटकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असून, प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा यासाठी सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.

जलदगतीने खटला चालवणार : मुख्यमंत्री

नराधमाला भर रस्त्यात फाशी देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भातील नागरिकांचा रोष साहजिक असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, त्या नराधमाला कोणतीही पळवाट मिळणार नाही, अशा पद्धतीने हा खटला जलदगतीने चालविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जलद न्यायाचे लेखी पत्र पीडितेच्या वडिलांना दिले असून त्यांनी परिस्थिती समजून घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले.

आरोपीला सात मेपर्यंत पोलिस कोठडी

आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर यासंदर्भातील सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी भांडणातून गोवल्याचा धक्कादायक बनाव रचला. मात्र, पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले. विशेष म्हणजे आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप आरोपीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT