नारायणगाव: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळतोय. 20 किलो वजनाचे क्रेट 950 ते 1000 रुपयाला विक्री होत आहेत. मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक 25 ते 35 हजार क्रेटची होत आहे. खरेदीसाठी विविध राज्यांमधून या ठिकाणी व्यापारी आले आहेत. बाजारभाव वाढल्याने दररोजची करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.
नारायणगावच्या मार्केटमध्ये जुन्नर तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांतून टोमॅटोची आवक अधिकची होत आहे. टोमॅटो एका किलोला 45 ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे सध्याची रोजची उलाढाल एक कोटी ते सव्वा कोटी रुपयांची होत आहे. शेतकरी 20 किलो वजनाचे टोमॅटोचे क्रेट विक्रीला आणत आहे. (Latest Pune News)
टोमॅटो घेण्यासाठी मुंबई, गुजरात, दिल्ली हरियाणा, मध्य प्रदेश, जयपूर आदी राज्यांतून व्यापारी दाखल झाले आहेत.टोमॅटोला दोन दिवसांपासून बाजारभाव वाढल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत मात्र टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकर्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले असून, टोमॅटो लागवडीसाठी केलेला सगळा खर्च वाया गेला आहे.
यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात लागवड केलेले टोमॅटो मे महिन्यात अधिकच्या पडलेल्या पावसामुळे पिकावर विपरित परिणाम होऊन विविध रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला. तसेच व्हायरस, तिरंगा, काळा चट्टा तसेच करपा मोठ्या प्रमाणात आल्याने टोमॅटो निम्म्याहून अधिक उत्पादन घटले.
वाहतूक व तोडणी खर्चदेखील शेतकर्यांच्या अंगावर आला. सध्या एप्रिल महिन्यात लागवड केलेलीे टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये विक्रीला येत आहेत. प्रामुख्याने गावठी टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळतोय. त्याचबरोबर आर्यमान आणि मेघदूत या व्हरायटीला जास्त मागणी आहे.
टोमॅटोला बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी टोमॅटो निवडून आणावीत जेणे करून टोमॅटोला व्यापार्यांकडून अधिकचा बाजारभाव मिळेल. शेतकर्यांसाठी नारायणगावच्या मार्केटमध्ये अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. टोमॅटोविक्रीसाठी येणार्या शेतकर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीचे कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून मार्केट यार्डमध्ये हजर राहून टोमॅटोविक्रीची वाहने व्यवस्थित लावून घेऊन शेतकर्यांना सहकार्य करण्याचे काम करत आहेत.- संजय काळे, सभापती जुन्नर बाजार समिती