Leopard Attack Pudhari
पुणे

Leopard Attack: नारायणगाव हादरले; बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगा जखमी

शिरोली बुद्रुक परिसरात बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: शिरोली बु. येथे दहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना बुधवारी (दि. ६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी मुलावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनेश दिनकर बोराडे (वय १०) हा मुलगा वडिलांसोबत गावातून घरी जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. सुदैवाने हा हल्ला त्याच्या पायावर निभावला, मात्र या घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

दरम्यान, शिरोली बु. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून मोटारसायकलस्वारांसह पाच ते सहा जणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार सूचना करूनही वन विभाग बिबट्याला पकडण्याबाबत उदासीन असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

युवा आघाडी अध्यक्ष सचिन थोरवे यांनी वेळोवेळी वन विभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती. काही ठिकाणी पिंजरे बसविण्यात आले; मात्र त्यामध्ये भक्ष्य न ठेवल्याने बिबट्या जेरबंद होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मानवांवरील बिबट्याचे हल्ले वाढत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

या घटनेच्या निषेधार्थ आणि वन विभागाने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आज सायंकाळी पाच वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवा आघाडी अध्यक्ष सचिन थोरवे यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT