पुणे

नारायणगाव : लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

backup backup

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र ओझर येथे श्रावणी सोमवार, संकष्टी चतुर्थी व १५ ऑगस्टचे औचित्य साधून लाखो भाविकांनी विघ्नहराचे दर्शन घेतले. १५ ऑगस्ट निमित्त विघ्नहरासमोर भारतीय तिरंगा ध्वजाची फुलांची आकर्षक आरस करण्यात आली होती. पहाटे ४ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, श्रीराम पंडित यांच्याहस्ते श्रींना महाअभिषेक, पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त अशोक सावंत, गणेश शेरकर, दत्तात्रय टेंभेकर, देविदास कवडे, चिंतामण जाधव यांना मिळाला.

पहाटे चार ते रात्री ११ पर्यंत रांगेत सुमारे २ लाख ५५ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा.''श्री" स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. चतुर्थी निमित्ताने श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने श्री. विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले. परिधान करण्यात येणाऱ्या सर्व रेशमी वस्त्र पोशाख व पेशवे कालीन मुकुटचा देखावा करण्यात आला. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान, चप्पल स्टँड ,पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.

सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. नंदू महाराज गावडे (येडगाव) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली खु. यांनी दिली. आजचे अन्नदाते संकष्टी चतुर्थीचे विकास आबा ताकावने, काफले बंधू , जाधव बंधू यांनी केले. वारकरी अन्नदान लंबोधर भालचंद्र रवळे, दत्तात्रय विनायक रवळे यांनी अन्नदान केले. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी देवस्थान ट्रस्टच्या विकास कामात सहभागी होवून ट्रस्टला देणगी दिली. आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. अण्णा मांडे, रंगनाथ रवळे यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT