Ganesh Idol Pudhari
पुणे

Narayangaon Ganesh Idol Prices: गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ; नारायणगावात बाप्पाच्या आगमनाची लगबग

कच्चा माल, रंग, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम; पीओपीच्या मूर्तींना अधिक मागणी

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नारायणगाव परिसरात गणेशमूर्ती विक्रीच्या दुकानांची लगबग वाढली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या रुपांतील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्ती खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग, वाहतूक तसेच मजुरीच्या खर्चात वाढ झाल्याने काही प्रमाणात गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. महागाई वाढल्याने गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना अधिक मागणी

शाडू मातीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार व विक्रेत्यांनी सांगितले. शाडू मातीची मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ, मेहनत आणि खर्च लागतो. त्याच तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती साच्याच्या माध्यमातून कमी वेळेत तयार करता येत असल्याने मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करणे शक्य होते. मात्र, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत आहे. त्यामुळे काही भाविकांकडून शाडू मातीच्या मूर्तींनाही पसंती दिली जात आहे.

दुकानदार म्हणतात...

गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या एका दुकानदाराने सांगितले की, गणेशोत्सव जवळ येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची संख्या वाढली आहे. घरगुती गणपतीसाठी मध्यम आकाराच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. यंदा मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढल्यामुळे काही मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, ग्राहकांच्या बजेटनुसार विविध किमतींच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत.

दुसऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या आणि आकर्षक मूर्तींना मागणी आहे. घरगुती गणपतीसाठी पारंपरिक तसेच छोट्या आकाराच्या मूर्तींना पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाला अजून काही दिवस असल्याने पुढील काळात विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

आणखी एका मूर्तिकाराच्या म्हणण्यानुसार, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी माती, रंग, साचे, मजुरी आणि वाहतूक यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे मूर्तींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, भक्तांच्या मागणीनुसार विविध आकार व किमतीतील मूर्ती तयार केल्या आहेत.

बाप्पाच्या आगमनाची भक्तांना उत्सुकता

गणेशोत्सव जवळ आल्याने नारायणगाव परिसरातील वातावरण गणेशमय होऊ लागले आहे. गणेशमूर्ती विक्रीची दुकाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली असून, सकाळपासून सायंकाळपर्यंत या दुकानांमध्ये भाविकांची ये-जा सुरू आहे. आपल्या घरातील गणपतीची मूर्ती निवडताना कुटुंबातील सदस्यांकडून विविध मूर्तींची पाहणी केली जात आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सजावट आणि इतर तयारीला वेग आला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणपती बाप्पाच्या आगमनाची गणेशभक्तांना आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे.

खोडद, पारुंडे, धामणखेलमध्ये मूर्तीनिर्मितीला वेग

जुन्नर तालुक्यातील खोडद, पारुंडे आणि धामणखेल परिसरात गणेशमूर्ती तयार करणारे अनेक कारखाने आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने या कारखान्यांमध्ये मूर्तीनिर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती येथे तयार केल्या जात आहेत. या कारखान्यांमध्ये साधारण तीन हजार रुपयांपासून तब्बल एक लाख रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काही महिन्यांपूर्वीच मोठ्या मूर्तींची नोंदणी केली असून, त्यांच्या मागणीनुसार मोठ्या आकाराच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT