नानगाव: दौंड तालुक्यातील नानगाव व शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई या दोन गावांना व दोन तालुक्यांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दि.६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दि.७ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देखील या पुलावरून पाणी वाहत असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.त्यामळे पुलावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
गेली आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात व डोंगर भागात पावसाला सुरुवात झाली असल्याने खाली वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे.डोंगरभागातील पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर नद्यांच्या पाणीपातळीत उतार चढ होत असतो.मात्र गेली दोन दिवसांपासून नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येत आहे.वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंधारे व काही पुल पाण्याखाली गेले आहेत.
नानगाव (ता.दौंड) येथील नदीवरील पुलावरून दि.६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाणी वाहु लागल्यामुळे संबंधित विभागाने हा पुलाच्या कडेला बॅरीकेट लाऊन पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.दि.७ रोजी देखील सकाळी पुलावर पाणी वाहत असल्याने सध्यातरी हा पुल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आला आहे.
नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने नदीकाठच्या शेतमालांचे नुकसान झाले असून नदीकाठचे बरेचसे क्षेत्र सध्या पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर काही काळ असाच राहिला तर नदीपात्रातील पाण्याची पातळी अशीच वाढेल व पुलावरील वाहतूक काही काळ बंद राहील अशी परिस्थिती दिसून येत आहे .