बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत नाटक हेच शस्त्र: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर Pudhari
पुणे

Nana Patekar| बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत नाटक हेच शस्त्र: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्पर्धेतील यशापयश विसरून नाटकाचे वेड अंगात भिनले पाहिजे. दु:ख गोळा करायला शिका. तीच दु:खे भूमिकांसाठी उपयोगी ठरतील. नाटकात काम करणे हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित ठेवू नका.

सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलत राहिली, तर नाटक शस्त्र म्हणून वापरायला विसरू नका, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उदयोन्मुख नाट्य कलाकारांना मोलाचा सल्ला दिला. कलाकारांना जे म्हणायचे आहे, सांगायचे आहे, त्यासाठी कला हे उत्तम माध्यम आहे, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले. (Latest Pune News)

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. नाना पाटेकर यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले, त्यावेळी पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

भरत नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, अंतिम फेरीतील स्पर्धेचे परीक्षक योगेश सोमण, अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य मंचावर उपस्थित होते.

पारितोषिक वितरण समारंभापूर्वी पुरुषोत्तम करंडक पटकाविणाऱ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने (हडपसर) ‌‘काही प्रॉब्लेम ये का?‌’ ही एकांकिका सादर केली.नटासाठी शरीर, आवाज किती महत्त्वाचा आहे, याचीही उदाहरणे पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. सतीश तारे, विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‌‘पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा केवळ नाट्यप्रयोगाची शृंखला नाही, तर ती तरुणांच्या विचारांची, स्वप्नांची आणि जबाबदारीची अभिव्यक्ती आहे. या मंचावर उभे राहिल्यानंतर असे वाटते की, वैश्विक विद्यापीठाच्या हृदयात उभे आहोत, जिथे जीवनाचे धडे शिकविले जातात; प्रश्न विचारले जातात आणि भावी समाजाचे आराखडे रेखाटले जातात.‌’

परीक्षक अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य आणि योगेश सोमण यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी लेखनाच्या उपयुक्ततेविषयी अश्विनी गिरी यांनी महत्त्वाचे मुद्दे विशद केले. स्पर्धेचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेसंदर्भात प्रदीप वैद्य यांनी काही सूचना केल्या. लेखन, दिग्दर्शन तसेच रंगमंचावरील तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. सुहास जोशी यांनी स्वागत केले. चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सूत्रसंचालन, निकालवाचन आणि आभारप्रदर्शन केले.

रंगमंच हा अतिशय छोटा दिसत असला, तरी हे अतिशय पावन क्षेत्र आहे. रंगमंचाचा योग्य वापर नक्की करा; पण ते विटाळू नका. स्पर्धेत पारितोषिक मिळण्याचा आनंद क्षणिक असतो. रंगमंचावर कसे दिसता, यापेक्षा प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचता हा मुद्दा महत्त्वाचा असतो. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, भवताल वेगळा असतो. लेखक लिहितो, दिग्दर्शक त्याच्या दृष्टीने नाटकाकडे पाहतो. लेखक, नट, दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून नाट्यकृती निर्माण होत असते.
- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT